ऑनलाईन टीम / लखनऊ :
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मोठ्या प्रमाणत लसीकरण मोहीम राबविली जात आहे. त्यातच उत्तर प्रदेश सरकारने एक विशेष निर्णय घेण्यात आला आहे.
या निर्णयानुसार, उत्तर प्रदेशातील प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी दोन – दोन ‘स्पेशल लसीकरण बूथ’ तयार केले जाणार आहेत. या बूथचा शुभारंभ सोमवारी म्हणजेच 7 जून रोजी केला जाणार आहे. लसीकरण मोहिमेला वेग देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत.
18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे लसीकरण, अभिभावक, कर्मचारी, शिक्षकांसाठी वेग वेगळे बूथ तयार करण्यात आले आहे. त्यानंतर आता योगी सरकारने खास महिलांसाठी ‘स्पेशल लसीकरण बूथ’ तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
सोमवारपासून सर्व महिला चिकित्सालय तथा संयुक्त चिकित्सालयात दोन ‘स्पेशल लसीकरण बूथ’ सुरू केले जाणार आहेत. या बुथवर केवळ महिलांचे लसीकरण केले जाईल. तसेच या बूथवरील सर्व स्टाफ देखील महिला कर्मचारी असतील.
दरम्यान, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कोरोना लसीकरण मोहिमेमध्ये बेजबाबदार वर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. यासोबत लसीकरण केंद्रावर सर्वांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन देखील केले आहे.