उचगाव फाटा-बसुर्ते क्रॉस रस्ता काम रेंगाळल्याने नागरिकांची निदर्शने
वार्ताहर/ उचगाव
उचगाव फाटा ते बसुर्ते क्रॉस या अडीच किलोमीटर अंतराच्या रस्ता दुरुस्तीचे काम रेंगाळल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी नागरिकांनी जोरदार निदर्शने करत कंत्राटदाराला घेराव घालून जाब विचारताच तातडीने रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे आश्वासन देताच काम बंद आंदोलन मागे घेण्यात आले.
उचगाव फाटा ते बसुर्ते फाटय़ापर्यंतच्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेऊन महिना उलटला तरी अद्याप रस्त्यावर खडी पसरविणे आणि रोलिंग करणे इतकेच काम सुरू ठेवल्याने संपूर्ण रस्ताभर खडी पसरल्याने या रस्त्यावरून ये-जा करणाऱया वाहनचालकांना अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता पार करणे अवघड झाले होते. यामध्ये अनेक वाहने घसरून पडून जखमी झाल्याच्या घटना दिवसेंदिवस वाढू लागल्याने नागरिकांना नाईलाजास्तव काम बंद आंदोलन करून कंत्राटदाराला घेराव घालून जाब विचारण्याची वेळ आली.
यावेळी ठेकेदार गोविंद राजू (जी. जी. कन्स्ट्रक्शन) यांनी सदर रस्ता तातडीने पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. तसेच रस्त्यावरील एक बाजू वाहतुकीसाठी खुली ठेवण्याचे मान्य केले.
तरुण भारत वृत्ताची दखल
या रस्त्याचे काम सुरू करण्यासाठी दै. तरुण भारतमधून आवाज उठविताच या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. तसेच संथगतीने चालले काम वाढवावे व रस्ता तातडीने पूर्ण करावा अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध करून आवाज उठविण्यात आला होता. याचीच दखल आता कंत्राटदाराने घेतली आहे.
काम बंद आंदोलनमध्ये अमर जाधव, नेहाल जाधव, पवन देसाई, किसन पावशे, डॉ. प्रवीण देसाई, डॉ. मोहन पावशे, डॉ. डी. एस. कदम, डॉ. वामन कदम, अंकुश पाटील, ग्रा. पं. चे माजी अध्यक्ष शिवाजी कुरबूर, अनिल देसाई, उमाशंकर देसाई, यल्लाप्पा हुंदरे, सुनील बुवा यासह या भागातील प्रवासी नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.