मुंबई \ ऑनलाईन टीम
राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. या भेटीचे काही फोटो देखील समोर आले आहेत.
यासोबतच पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्वीट करत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्राचे राज्यपाल महामहिम श्री. भगत सिंह कोश्यारीजी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांनी दिलेल्या शुभेच्छा आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेली राज्यपालांची भेट यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे.
चांगल्या प्रसंगात असेल किंवा वाईट काळात असेल महाराष्ट्रातील राजकीय मंडळी सर्व हेवेदावे बाजूला ठेऊन आपल कर्तव्य निभावत असतात. राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष आहे. मात्र तरीही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.