प्रतिनिधी / बेळगाव
टिळकवाडी रानडे रोड येथील डेनेज वाहिनी तुंबल्याने गटारीमधून सांडपाणी वाहत होते. अखेर याची दखल महापालिका प्रशासनाने घेतली असून, स्वच्छता विभागाच्या कर्मचाऱयांनी डेनेजची दुरुस्ती केली आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या समस्येचे निवारण झाल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
टिळकवाडी व्हॅक्सिन डेपो मैदानाजवळील डेनेज वाहिनी तुंबली होती. सदर समस्येचे निवारण करण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले होते. तुंबलेल्या डेनेज वाहिनीची दुरुस्ती करण्याऐवजी सांडपाणी गटारीत सोडून स्वच्छता विभागाच्या अधिकाऱयांनी जबाबदारी झटकली होती. स्मार्ट सिटी योजनेंतर्गत बांधण्यात येत असलेल्या रानडे रोड येथील गटारीचे बांधकाम अर्धवट झाले होते. त्यामुळे सांडपाणी साचून परिसरात दुर्गंधी पसरली आहे. परिसरातील विहिरींचे पाणी दूषित झाले होते. याबाबत महापालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांकडे तक्रार करूनही दखल घेण्यात आली नव्हती.
दुर्गंधीपासून रहिवाशांची सुटका
‘तरुण भारत’ने वृत्त प्रसिद्ध करून नागरिकांच्या समस्येकडे महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. या वृत्ताची दखल घेऊन मनपाच्या आरोग्य विभागाने तातडीने धाव घेऊन डेनेज वाहिनीची दुरुस्ती केले आहे. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून निर्माण झालेल्या दुर्गंधीपासून येथील रहिवाशांची सुटका झाली आहे. सदर समस्येचे निवारण करण्यात आल्याने रहिवाशांनी समाधान व्यक्त करून मनपा अधिकाऱयांचे आभार मानले. येथील निर्माण होणाऱया समस्यांचे निवारण आणि स्वच्छतेचे काम वेळेवर करावे, अशी मागणी करण्यात आली.