वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
20 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबर दरम्यान होणाऱया दुसऱया लिजेंडस् लीग क्रिकेट स्पर्धेत भारताचे माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग, इरफान पठाण, युसूफ पठाण सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा मस्कत (ओमान) येथे खेळविली जाईल. सदर माहिती वीरेंद्र सेहवागने पत्रकार परिषदेत दिली.
लिजेंडस् लीग क्रिकेट स्पर्धेचे रवि शास्त्री हे प्रमुख कमिशनर आहेत. लिजेंडस् लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱया हंगामामध्ये जगातील विविध देशांचे अव्वल माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत. पहिल्या लिजेंडस् लीग क्रिकेट स्पर्धेत भारत, पाक, लंका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड देशांचे माजी क्रिकेटपटू सहभागी झाले होते. या स्पर्धेमध्ये एकूण 3 संघांचा सहभाग राहिल. भारत, आशिया आणि शेष विश्व अशा तीन संघांमध्ये विविध देशांचे माजी क्रिकेटपटू सहभागी होणार आहेत.