जिल्हय़ात अबकारी विभागाची कारवाई : मद्यसाठा-वाहने ताब्यात
प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोना महामारी थोपविण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. या काळात मद्यविक्री बंदीचाही आदेश आहे. त्यामुळे गावठी व बेकायदा दारू व्यवसाय फोफावला आहे. हा व्यवसाय थोपविण्यासाठी अबकारी विभागाने लॉकडाऊनच्या काळात कारवाई करून 1 कोटी 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
यासंबंधी अबकारी उपायुक्त बसवराज यांनी सोमवारी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. जिल्हय़ात बेकायदा व गावठी दारू व्यवसाय थोपविण्यासाठी अबकारी विभागाने पथके स्थापन केली आहेत. या पथकांनी 24 मार्च 2020 पासून आतापर्यंत दिवसा व रात्रीच्या वेळी गस्त घालून वाहनांची तपासणी करण्याचा सपाटा सुरू केला आहे.
जिल्हय़ात आतापर्यंत 794 ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. 108 प्रकरणे दाखल करून 64 जणांना अटक करण्यात आली आहेत. 4 हजार 662.695 लिटर मद्यसाठा, 95.900 लिटर गोवा मद्य, 10.170 लिटर महाराष्ट्र बनावटीचे मद्य, 1207.200 लिटर बियर, 53 लिटर शिंदी, 170 लिटर गुळाचे रसायन जप्त करण्यात आले आहे.
79.610 लिटर संत्रा, 93 लिटर हुर्राक, 1714.400 लिटर गावठी दारू, 50 किलो गूळ, 7.400 लिटर वाईन जप्त करण्यात आली आहे. 79 दुचाकी, दोन ऑटोरिक्षा, दोन कार, चार गुड्स वाहने, एक महिंद्रा पिकअप अशी एकूण 88 वाहने जप्त करण्यात आली असून दारूसाठा व वाहनांची मिळून किंमत 1 कोटी 10 लाख रुपये इतकी होते, अशी माहिती अबकारी अधिकाऱयांनी दिली आहे.