फौंड्री क्लस्टरने सर्व कारखाने बंद ठेवून सुवर्णसौधला दिली धडक : कारखाने बंदमुळे सर्वत्र शुकशुकाट
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोनामुळे अनेक व्यवसाय अडचणीत आले आहेत. अशातच इंधन दरवाढ आणि कच्च्यामालाची दरवाढदेखील मोठय़ा प्रमाणात झाली आहे. दरवाढीमुळे व्यवसाय करणे कठीण बनले आहे. या दरवाढीच्या विरोधात फौंड्री क्लस्टरने उद्यमबागमधील सर्व कारखाने बंद ठेवून सुवर्णसौधला धडक दिली आहे.
दरवाढीच्या विरोधात आंदोलन छेडून उद्यमबागमधील सर्व औद्योगिक व्यवसाय सोमवारी बंद ठेवण्यात आले होते. दररोज 24 तास गजबजणाऱया औद्योगिक वसाहतीत सोमवारी शुकशुकाट पसरला होता. कच्च्यामालाचे दर वाढल्याने व्यवसाय करणे अडचणीचे बनले आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. अशात दरवाढीमुळे व्यवसाय बंद करण्याची वेळ आली आहे. दरवाढीवर केंद्र आणि राज्य शासनाचे कोणतेच नियंत्रण नाही. हजारो कामगार औद्योगिक वसाहतीमधील व्यवसायांवर उदरनिर्वाह करतात. येथील व्यवसाय बंद केल्यास हजारो कामगार बेरोजगार होण्याची भीती आहे. त्यामुळे महागाईला तोंड देत कारखानदार आपले व्यवसाय चालवित आहेत. शासनाकडे आपल्या समस्यांचे गाऱहाणे मांडण्यासाठी वाढत्या महागाईविरोधात व्यवसाय बंद ठेवण्यात आले. सुवर्णसौध परिसरात आंदोलन छेडून कच्च्यामालाचे दर नियंत्रणात आणा, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे सोमवारी उद्यमबाग परिसरातील कारखाने बंद होते. सर्व कारखाने बंद ठेवण्यात आल्याने शुकशुकाट पसरला होता.