परिवहनला दिलासा : मात्र, अद्यापही निर्दिष्ट उत्पन्नापासून दूरच
प्रतिनिधी /बेळगाव
मागील दोन वर्षांपासून कोरोनामुळे अडचणीत आलेल्या वातानुकूलित आराम बसच्या महसुलात पुन्हा वाढ होत आहे. या बससेवेच्या माध्यमातून मिळणारा दैनंदिन महसूल 14 लाखावर पोहोचला आहे. त्यामुळे परिवहनला दिलासा मिळाला आहे. कोरोनापूर्वी आराम बससेवेच्या माध्यमातून दैनंदिन 18 लाखाचा महसूल मिळत होता. त्यामुळे अद्याप परिवहन निर्दिष्ट महसुलापासून दूरच आहे.
कोरोनामुळे मागील दोन वर्षांत परिवहनला प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक, लांब पल्ल्याच्या बससेवेबरोबरच वातानुकूलित बसेस विविध मार्गांवर धावत आहेत. मध्यवर्ती बसस्थानकातून बेंगळूर, मंगळूर, म्हैसूर, नाशिक, हैदराबाद, चेन्नई, तिरुपती, मुंबई आदी शहरांकडे वातानुकूलित आराम बस धावत आहे. दरम्यान, नवरात्रोत्सवामुळे प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली आहे. लांब पल्ल्यासाठी प्रवासी वातानुकूलित आराम बसला प्रसंती देतात. त्यामुळे महसुलात वाढ झाली आहे.
बेळगाव आगारातून बेळगाव-हैदराबाद, बेळगाव-बेंगळूर, बेळगाव-म्हैसूर, बेळगाव-ठाणे, बेळगाव-तिरुपती अशा एकूण 82 वातानुकूलित आराम बस दररोज वेगवेगळय़ा मार्गांवर धावत आहेत. या बससेवेला प्रवाशांचा समाधानकारक प्रतिसाद मिळत आहे. मात्र महाराष्ट्रात अद्याप सुरळीत बससेवा सुरू नसल्यामुळे महसुलापासून दूर रहावे लागत आहे. शिवाय येत्या दिवसांत पुन्हा बससेवेला प्रतिसाद वाढेल, अशी आशादेखील परिवहनला आहे. शासनाने मंदिरे, सिनेमागृह पर्यटनस्थळे यासह इतर गोष्टींना परवानगी दिल्याने बाहेर फिरणाऱया प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे वातानुकूलित बसला प्रवाशांचा प्रतिसाद वाढला आहे.
बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवास
लॉकडाऊननंतर परिवहन मंडळाची प्रवासी वाहतूक सुरू झाल्यानंतर क्षमतेच्या 50 टक्के प्रवाशांची वाहतूक करण्यास परिवहन मंडळाने परवानगी दिली होती. मात्र आता शासनाकडून मिळालेल्या मार्गदर्शक सूचनानंतर परिवहनच्या बसमधून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र बसमधून प्रवास करणाऱया प्रवाशांना मास्क व सॅनिटायझरचा वापर बंधनकारक आहे.