वृत्तसंस्था/ किंग्जस्टन
येथील सबीना पार्क मैदानावर झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात विंडीजने आयर्लंडचा 24 धावांनी पराभव करून तीन सामन्यांच्या या मालिकेत विजयी सलामी दिली. विंडीजतर्फे ब्रुक्स आणि किरॉन पोलार्ड यांची कामगिरी दर्जेदार झाली. ब्रुक्सने 93 तर कर्णधार पोलार्डने 69 धावा झळकविल्या. या मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी खेळविला जाणार आहे.
या पहिल्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना विंडीजने 49.1 षटकांत सर्वबाद 269 धावा जमविल्या. त्यानंतर आयर्लंडचा डाव 48.5 षटकांत 245 धावांत आटोपला.
विंडीजच्या डावामध्ये ब्रुक्सने 89 चेंडूत 3 षटकार आणि 9 चौकारांसह 93, कर्णधार पोलार्डने 66 चेंडूत 4 षटकार आणि 4 चौकारांसह 69, होपने 44 चेंडूत 3 चौकारांसह 29, पुरनने 2 चौकारांसह 13, जेसन होल्डरने 2 चौकारांसह 13, ओडेन स्मिथने 2 षटकार आणि 1 चौकारांसह 8 चेंडूत 18 धावा जमविल्या. विंडीजच्या डावात 9 षटकार आणि 23 चौकार नोंदविले गेले. विंडीज संघाची स्थिती सुरूवातीला 4 बाद 62 अशी केविलवाणी होती. त्यानंतर ब्रुक्स आणि पोलार्ड यांनी पाचव्या गडय़ासाठी 155 धावांची भागिदारी केली. आयर्लंडतर्फे क्रेग यंग आणि मार्क ऍडेर यांनी प्रत्येकी 3 तर लिटल, कँफर यांनी प्रत्येकी एक आणि मॅकब्राईनने 2 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आयर्लंडच्या डावात कर्णधार बलबिर्नीने 1 षटकार आणि 7 चौकारांसह 94 चेंडूत 71, टॅक्टरने 68 चेंडूत 1 षटकार आणि 5 चौकारांसह 53, मॅकब्राईनने 50 चेंडूत 5 चौकारांसह 34, डॉक्रेलने 25 चेंडूत 1 षटकार आणि दोन चौकारांसह 30, ऍडेरने 9 चेंडूत 3 षटकारांसह 21 धावा जमविल्या. आयर्लंडच्या डावात 6 षटकार आणि 21 चौकार नोंदविले गेले. विंडीजतर्फे जोसेफ आणि शेफर्ड यांनी प्रत्येकी 3 तर स्मिथने 2 व होल्डर, हुसेन यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
संक्षिप्त धावफलक
विंडीज 48.5 षटकांत सर्वबाद 269 (ब्रुक्स 93, पोलार्ड 69, होप 29, होल्डर 13, पुरन 13, स्मिथ 18, ऍडेर 3-38, यंग 3-56, मॅकब्राईन 2-52, लिटल 1-46, कँफर 1-47)
आयर्लंड 49.1 षटकांत सर्वबाद 245 (बलबिर्नी 71, टॅक्टर 53, मॅकब्राईन 34, डॉक्रेल 30, ऍडेर 21, जोसेफ 3-55, शेफर्ड 3-50, स्मिथ 2-26, होल्डर 1-48, हुसेन 1-35).