प्रतिनिधी / बेळगाव
व्यवसाय परवाना घेण्याचे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले होते. मात्र असंख्य व्यावसायिकांनी व्यवसाय परवाने घेतले नाहीत. त्यामुळे महापालिकेच्यावतीने व्यवसाय परवाना तपासणी मोहीम हाती घेण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड आणि रामनगर परिसरातील व्यवसाय परवाना तपासणी मोहीम राबविण्यात आली. व्यवसाय परवाना नसल्याने यावेळी 18 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संजय डुमगोळ यांच्या नेतृत्वाखाली व्यवसाय परवाना तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील विविध भागात ही मोहीम राबविण्यात आली. असंख्य व्यावसायिकांकडे परवाना नसल्याचे निदर्शनास आले आहे. यापूर्वी बाजारपेठेतील व्यापाऱयांकडे व्यवसाय परवान्याची विचारणा करून दंडात्मक कारवाई राबविली होती. त्यामुळे व्यवसाय परवाना घेण्यासाठी मनपाकडे धाव घेण्यात आली आहे. तसेच महापालिकेच्यावतीने उपनगरात व्यवसाय परवाना तपासणी मोहीम हाती घेतली असून डॉ. आंबेडकर रोड, कोल्हापूर क्रॉस, एस. पी. ऑफिस रोड, रामनगर, अशा विविध भागात तपासणी मोहीम राबविण्यात आली. सदर व्यावसायिकांकडे परवाना नसल्याचे आढळल्यामुळे दंड वसूल केला. 20 व्यावसायिकांची तपासणी केली असता 8 व्यावसायिकांकडे परवाने नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दंड वसूल करून व्यवसाय परवाना घेण्याची सूचना केली. प्रत्येक व्यावसायिकांकडे जाऊन व्यवसाय परवान्याची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.