मंत्री एस. सुरेशकुमार यांचे स्पष्टीकरण : शिक्षण खात्यातील अधिकाऱयांशी आणखी दोन दिवस चर्चा
प्रतिनिधी / बेंगळूर
राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. सध्याची एकंदर परिस्थितीचा अभ्यास करून मुख्यमंत्र्यांकडे अहवाल सादर केला जाईल. आणखी दोन दिवस तज्ञांशी चर्चा करण्यात येणार आहे. त्यानंतरच शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती प्राथमिक-माध्यमिक शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार यांनी दिली.
शाळा सुरू करण्यासंबंधी बुधवारी बेंगळूरमध्ये शिक्षण खात्यातील अधिकाऱयांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बैठकीत शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय झालेला नाही. सर्व बाबींचा विचार करून अंतिम निर्णय घेण्यात येणार आहे. सध्या आठवी इयत्तेपुढील वर्ग सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. परंतु, याविषयी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
बैठकीत शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनी आठवीनंतरचे वर्ग सुरू करता येतील. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेखातर सामान्य प्रवासी बसऐवजी स्वतंत्र बसेस सोडता येतील, शाळा-महाविद्यालये सुरू करण्यापूर्वी विद्यार्थी वसतीगृहे सुरू करावीत, असे सल्ले शिक्षणमंत्र्यांना देण्यात आले.
प्राध्यापकांना 11 नोव्हेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’
राज्य सरकारने पदवी महाविद्यालयीन प्राध्यापकांना महत्त्वाची सूचना दिली असून बुधवारपासून 11 नोव्हेंबरपर्यंत ‘वर्क फ्रॉम होम’ (घरातून काम) करण्याचा आदेश दिला आहे. यासंबंधीचे पत्रक जारी करण्यात आले असून 2020-21 या शैक्षणिक वर्षातील वर्ग सुरू करण्यासाठी पूर्वतयारी, डिजिटल लर्निंग, ऑनलाईन/ऑफलाईन अध्यापन, शैक्षणिक साहित्याची जुळवाजुळव आदी तयारी करण्याची सूचना दिली आहे. तसेच तातडीची कामे, अत्यावश्यक कामांसाठी प्राचार्यांनी हजर राहण्याची सूचना केल्यास संबंधित प्राध्यापकांना महाविद्यालयात हजर होण्याची सूचनाही करण्यात आली आहे.