कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही समितीतर्फे एसओपीचे पालन नाही
प्रतिनिधी / फोंडा
फोंडा तालुका अंत्रुज शिमगोत्सव समितीतर्फे म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीला परंपरेनुसार नमन घालण्यात आले. शुक्रवारी सायंकाळी रोमटामेळ मिरवणुकीसह पारंपारिक फेटेधारी पेशाखात ढोल ताशांच्या गजरात देवीची भेट व दर्शन घेण्यात आले. मात्र यावेळी समितीतर्फे कोविड एसओपीचे पालन करण्यात आल्याचे निदर्शनास आले.
म्हार्दोळ येथील मंदिरापर्यंत रोमटामेळासह मिरवणूक काढण्यात आली. यावेळी शासकीय शिमगोत्सव समितीचे सचिव नगराध्यक्ष विश्वनाथ दळवी, खजिनदार उपजिल्हाधिकारी प्रदीप नाईक तसेच अशोक नाईक, हनुमंत नाईक, नगसेवक आनंद नाईक, पंचसदस्य दादी नाईक यांच्यासह फोंडा तालुक्यातील शिमगोप्रेमी नागरिक मोठय़ासंख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. महालसेच्या नमन शिस्तबद्धरित्या मोठय़ा उत्साहात पार पडले मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावातही आयोजन समितीच्या पदाधिकाऱयांनी फेसमास्क परिधान केले नव्हते. उत्साहाच्या भरात मुख्याधिकाऱयांनीही एसओपीचे पालन करण्याचे भान राहिले नव्हते.
फोंडा तालुक्यात शासकीय पातळीवरील राज्यस्तरीय शिमगोत्सव मिरवणूक 30 मार्च रोजी आयोजित करण्यात आली होती. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शासकीय शिमगोत्सव रद्द झाल्याची माहिती विधानसभा अधिवेशनात दिल्याने फोंडा तालुक्यातील शिमगोत्सव प्रेमी हिरमुसलेले आहे. परंपरेनुसार म्हार्दोळ येथील श्री महालसा देवीला नमन घालण्यात आले. प्रियोळ येथील खेडेकर दहाजण समाजाच्या रोमटामेळ मिरवणूकीसह हा नमनाचा कार्यक्रम झाला.