बँकॉक : येथे सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या विश्व टूर फायनल्समध्ये भारताचे बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू आणि किदांबी श्रीकांत यांना अनुक्रमे महिला आणि पुरूष एकेरीत दुसरा पराभव पत्करावा लागल्याने त्यांचे बाद फेरीत प्रवेश मिळविण्याचे स्वप्न अधुरे राहिले. सलग दोन पराभवामुळे त्यांचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
आठवडय़ापूर्वी झालेल्या स्पर्धेतील सामन्यात भारताच्या पी.व्ही. सिंधुला आर. इंटेनॉनकडून हार पत्करावी लागली होती. त्यानंतर या स्पर्धेत थायलंडच्या तृतीय मानांकित इंटेनॉनने पुन्हा माजी विश्वविजेत्या पी.व्ही. सिंधूचा 21-18, 21-13 असा पराभव केला. पुरूष एकेरीत सामन्यात तैवानच्या वांग वेईने किदांबी श्रीकांतचा 19-21, 21-9, 21-19 अशा गेम्समध्ये पराभव केला. या पराभवामुळे श्रीकांतचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.