दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत भारताचा 9 धावांनी निसटता पराभव, सॅमसन-शार्दुलची सहाव्या गडय़ासाठी 93 धावांची भागीदारी, क्लासेन-मिलर यांची नाबाद अर्धशतके
लखनौ / वृत्तसंस्था
संजू सॅमसनने 63 चेंडूत नाबाद 86 धावांचा झंझावात साकारल्यानंतरही भारताला स्वैर गोलंदाजी व दर्जाहिन क्षेत्ररक्षणाचा कमालीचा फटका बसला आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या वनडेत 9 धावांनी निसटता पराभव पत्करावा लागला. पावसाने व्यत्यय आलेल्या या सामन्यात निर्धारित 40 षटकात दक्षिण आफ्रिकेने 4 बाद 249 धावा फटकावल्या तर प्रत्युत्तरात भारताला 8 बाद 240 धावांपर्यंत पोहोचता आले.
विजयासाठी 250 धावांची आवश्यकता असताना सॅमसनने 86 धावा फटकावल्या. शिवाय, शार्दुलसह सहाव्या गडय़ासाठी 93 धावांची भागीदारी साकारली. पण, शार्दुल बाद झाल्यानंतर भारताच्या डावाला पुन्हा एकदा गळती लागली आणि शेवटच्या टप्प्यात सहकाऱयांच्या संथ फलंदाजीमुळे सॅमसनच्या प्रयत्नांवर मर्यादा राहिल्या. भारतीय क्षेत्ररक्षकांनी तब्बल 4 झेल सोडले, याचा मोठा फटका बसला. सॅमसनला श्रेयस अय्यरने 37 चेंडूत 50 धावांसह उत्तम साथ दिली. शिवाय, शार्दुल ठाकुरने 31 चेंडूत 33 धावांचे योगदान दिले. मात्र, आघाडीवीरांचे अपयश संघासाठी मारक ठरले. दक्षिण आफ्रिकेतर्फे एन्गिडीने 3 तर रबाडाने 2 बळी घेतले.
मिलर, क्लासेनची अर्धशतके
तत्पूर्वी, डेव्हिड मिलर व हेन्रिच क्लासेन यांनी शानदार अर्धशतके झळकावल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने भारताविरुद्ध निर्धारित 40 षटकात 4 बाद 249 धावांपर्यंत मजल मारली. पावसाने व्यत्यय आणलेल्या या लढतीत संघ 4 बाद 110 असा अडचणीत असताना मिलर (63 चेंडूत नाबाद 75) व क्लासेन (65 चेंडूत नाबाद 74) यांनी पाचव्या गडय़ासाठी 139 धावांची अभेद्य भागीदारी नोंदवली. या भागीदारीमुळेच दक्षिण आफ्रिकेला 250 धावांच्या उंबरठय़ापर्यंत पोहोचता आले.
भारतीय संघातर्फे शार्दुल ठाकुरने 8 षटकात 35 धावात 2 बळी घेतले. प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेने 10 षटकाअखेर बिनबाद 41 धावा केल्या. पावसाचा व्यत्यय आल्याने ही लढत 40 षटकांची निर्धारित करण्यात आली. या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व शिखर धवन सांभाळत आहे.
संक्षिप्त धावफलक
द. आफ्रिका : 40 षटकात 4 बाद 249 (हेन्रिच क्लासेन 65 चेंडूत 6 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 74, डेव्हिड मिलर 63 चेंडूत 5 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 75, क्विन्टॉन डी कॉक 54 चेंडूत 5 चौकारांसह 48, जानेमन मलान 3 चौकारांसह 22. अवांतर 22. शार्दुल ठाकुर 8 षटकात 2-35, रवि बिश्नोई, कुलदीप यादव प्रत्येकी 1 बळी).
भारत : 40 षटकात 8 बाद 240 (संजू सॅमसन 63 चेंडूत 9 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 86, श्रेयस अय्यर 37 चेंडूत 8 चौकारांसह 50, शार्दुल ठाकुर 31 चेंडूत 5 चौकारांसह 33. अवांतर 18. लुंगी एन्गिडी 8 षटकात 3-52, कॅगिसो रबाडा 8 षटकात 2-36, पर्नेल, केशव महाराज, शमसी प्रत्येकी 1 बळी).