सेन्सेक्स 191 अंकांनी प्रभावीत : एचडीएफसी , ऍक्सिस बँक नुकसानीत
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्सचा तेजीचा प्रवास अखेर चालू आठवडय़ातील अंतिम दिवशी शुक्रवारी खंडित झाला आहे. यामध्ये बीएसई सेन्सेक्स 191 अंकांनी प्रभावीत होत बंद झाला आहे. जागतिक पातळीवरील मिळताजुळता कल राहण्याबरोबरच मजबूत हिस्सेदारी ठेवणाऱया विविध कंपन्यांपैकी एचडीएफसी लि., एचडीएफसी बँक आणि ऍक्सिस बँक यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत.
चढ उताराच्या प्रवासात शुक्रवारी सेन्सेक्स 190.97 अंकांनी प्रभावीत होत 57,124.31 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 68.85 अंकांसह निर्देशांक 17,003.75 वर बंद झाला आहे.
दिग्गज कंपन्यांमध्ये एनटीपीसीचे समभाग सर्वाधिक तीन टक्क्यांनी नुकसानीत राहिले असून अन्य कंपन्यांमध्ये महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, ऍक्सिस बँक, पॉवरग्रिड कॉर्प, कोटक बँक, डॉ.रेड्डीज लॅब, बजाज फिनसर्व्ह आणि एचडीएफसी यांचे समभाग घसरणीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये एचसीएल टेक, टेक महिंद्रा, विप्रो आणि इन्फोसिस यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
अन्य घटनांचा प्रभाव
ख्रिसमसच्या पार्श्वभूमिवर बाजारात काहीसे चढउताराचे वातावरण राहिले होते, यामध्ये चालू महिना आयटी क्षेत्राचा राहिला होता. विविध क्षेत्रातील आर्थिक स्थितीसह अन्य गोष्टींचा प्रभाव राहिल्याने गुंतवणूकदार चिंतेत होते, असे अभ्यासक सांगतात. यासह निर्यात व कर संकलन मजबूत राहण्यासोबत उत्पादनास प्रोत्साहन देणाऱया योजनांमध्येही सकारात्मक राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु अजून अशी काही क्षेत्रे आहेत त्यामध्ये सुधारणात्मक स्थिती नसून त्यासाठी आगामी काळासाठी गुंतवणूक करण्यावर भर देण्याची गरज असल्याचेही काही अभ्यासकांनी नमूद केले आहे.
जागतिक बाजारात शुक्रवारी आशियातील हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरायाचा कोस्पी हे लाभात राहिले आहेत, तर चीनचा शांघाय कम्पोजिट निर्देशांक व जपानचा निक्की नुकसानीसह बंद झाला आहे.