चारजण किरकोळ जखमी, माथेफिरु पोलिसांच्या ताब्यात
प्रतिनिधी /सातारा
सातारा शहरातून जकातवाडी, परळीकडे जाणाऱया बोगदा परिसरात नागरिक दररोज सकाळी मॉर्निंग वॉकसाठी जातात. आज सकाळीही नागरिक मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडले. अन् अचानक एका माथेफिरुने त्यांच्यावर लोखंडी सळी फेकून मारत भालाफेक केली. त्यामुळे लोकांची धांदल उडाली. भालाफेक करत माथेफिरुने 4 जणांना किरकोळ मारहाण केली. याची खबर मिळताच तालुका पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी या माथेफिरूला ताब्यात घेतल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. विजय गोळे असे या माथेफिरुचे नाव आहे. माथेफिरूला नागरिकांकडूनही मारहाण झाल्याने तो जखमी असून, पोलिसांनी त्याला जिल्हा सरकारी रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी अद्याप कोणतीही तक्रार दाखल झाली नसल्याने या माथेफिरुवर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.