दोन कोटींचे नुकसान – चार तासांच्या परिश्रमाने आग आटोक्यात
प्रतिनिधी/ कोरेगाव
सातारारोड येथील वसंत सहकारी औद्योगिक वसाहतीतील गणेश फरसाणा कंपनीला मंगळवारी पहाटे आग लागली. बघता-बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे लोट आणि धुरामुळे परिसरात गोंधळ उडाला होता. या घटनेत कंपनी जळून खाक झाल्याने सुमारे दोन कोटीचे नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
सातारारोडच्या चौकी परिसरात यशवंत औद्योगिक सहकारी संस्था आहे. जुन्या काळातील ही औद्योगिक वसाहत असून, कूपर कारखान्यासाठी लागणाऱया छोटय़ा-मोठय़ा स्पेअर्स बनविणारे अनेक उद्योग येथे होते. कालांतराने कूपर कारखान्याचे उत्पादन कमी आल्यानंतर या औद्योगिक वसाहतीची रया गेली. सद्यस्थितीत स्थानिक लोकांचे छोटे-मोठे कारखाने तेथे आहेत.
सातारारोडमधील नंदकुमार नामदेव कुलकर्णी आणि विनायक परशुराम गजरे यांनी एकत्रित येऊन 14 हजार चौरस फूट क्षेत्रावर श्री गणेश फरसाणा कंपनीची स्थापना केली. ती 7 हजार चौरस फूट इमारतीत कंपनी सुरु होती. तर तिथेच शाही नमकीन कंपनी सुरु केली आहे.
मंगळवारी पहाटे 4 च्या सुमारास या कंपनीला आग लागली. फरसाणा निर्मितीसाठीचे तेल, खाद्यपदार्थ आदी ज्वलनशील साहित्य व मशिनरी असल्याने आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचे मोठे लोट आणि धुरामुळे सातारारोडमध्ये एकच खळबळ उडाली. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक ग्रामस्थ आणि युवकांनी अग्निग्नशामक दलाचे बंब येईपर्यंत मिळेल त्या वस्तुने पाणी आणून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. सातारा, रहिमतपूर यासह अनेक नगरपालिकांचे अग्निशामक दलाचे बंब, कूपर कंपनीची अग्निग्नशमन यंत्रणा, ग्रामस्थ आणि पोलिसांनी अविरत परिश्रम घेतल्यानंतर तब्बल चार तासांनी आग आटोक्यात आणली गेली
सातारारोड दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे, हवालदार मिलिंद कुंभार, कर्मचारी सोनमळे यांच्यासह पोलीस दल, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचाऱयांनी परिश्रम घेतले. मंडल अधिकारी जाधव, तलाठी प्रशांत पवार यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात आगीच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष साळुंखे तपास करत आहेत.