वृत्तसंस्था/ ऑकलंड
सेरेना विल्यम्स व कॅरोलिन वोझ्नियाकी यांनी एएसबी क्लासिक टेनिस स्पर्धेत महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश मिळविला आहे. या दोघीही फक्त एकदाच या स्पर्धेत एकत्र खेळण्याचा निर्णय घेतला आहे.
सेरेना-वोझ्नियाकी यांनी अग्रमानांकित स्वीडनची जोहाना लार्सन व अमेरिकेची कॅरोलिन डोलेहाईड यांचा 6-2, 6-1 असा फडशा पाडला. त्याआधी पहिल्या फेरीत त्यांनी जपानच्या नाओ हिबिनो-माकोटो निनोमिया यांना हरविले होते. सेरेना-कॅरोलिना ऑस्ट्रेलिया ओपनमध्ये एकत्र खेळणार नसल्याचे त्यांनी याआधीच स्पष्ट केले होते. मात्र मे मध्ये कोपनहेगन येथे प्रदर्शनीय सामन्यात ते एकत्र खेळणार आहेत.
या स्पर्धेच्या एकेरीत वोझ्नियाकीची दुसऱया फेरीची लढत लॉरेन डेव्हिसशी तर सेरेनाची लढत आपल्याच देशाच्या ख्रिस्तिना मॅकहेलशी होणार आहे. वाईल्ड कार्ड प्रवेश मिळालेल्या युजीन बुचार्डने आठव्या मानांकित कॅरोलिना गार्सियाचा 6-4, 6-4 असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. अन्य एका सामन्यात फ्रान्सच्या ऍलिझ कॉर्नेटने पेत्र मार्सिकचा 3-6, 6-4, 6-4 असा पराभव केला.