एक हजार 800 वृक्ष लागवडीचा आमदार विजयकुमार देशमख यांचा संकल्प, वृक्ष संगोपन ही व्यापाऱयांची जबाबदारी
प्रतिनिधी/सोलापूर
सोलापूर कृषी उत्पन बाजार समितीने 1 हजार 800 वृक्षाची लागवड करण्याचा संकल्प केला आहे. यासाठी समितीचे सभापती आमदार विजयकुमार देशमुख यांनी पुढाकार घेतला आहे. येणाऱया काळात बाजार समिती वृक्षलागवडीच्या हिरवाईने नटलेली दिसणार आहे. वृक्ष लागवडीच्या संकल्पनेत बाजार समिती प्रशासन आणि व्यापाऱयांचा मोलाचा वाटा असणार आहे.
बाजार समितीतील मुख्य रस्त्यांचे काम पूर्ण झाले. त्यावेळी येथे वृक्ष तोड करण्यात आली होती. परंतु, पुन्हा तेथे वृक्षांची लागवड करण्यात आली नाही. येणाऱया काळात फुल मार्केट, कांदा मार्केट, फळांचे मार्केट, भुसार व्यापारी आणि ड्रायपुटच्या दुकानांसमोरील रस्त्यांचे काम सुरु होणार आहे. या रस्त्याच्या कामावेळी झाडांसाठीची जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्या जागेत म्हणजेच प्रत्येक दुकानाच्या दोन्ही बाजूस वृक्ष लागवड करण्याचा संकल्प आमदार देशमुख यांनी केला आहे. दुकानासमोरील झाडांचे संगोपन करण्याच्या जबाबदारीची अट व्यापाऱयांना घालण्यात आली आहे.
ज्या दुकानदारांनी झाडे लाऊन जोपासली त्यांचाच परवाना नुतनीकरण केला जाणार आहे. ज्या व्यापाऱयांनी याकडे दुर्लक्ष केले अशा व्यापाऱयांच्या परवान्याचे नुतणीकरण केले जाणार नाही. झाडांसाठी लागणारे खत बाजार समितीकडून देण्यात येणार आहे. बाजार समिती आवारात वृक्षाचे संवर्धन व्हावे, धुळीचे प्रमाण कमी व्हावे, शेतकरी, व्यापारी, आडत दुकानदार, हमाल-तोलार या वर्गांना नैसर्गिक ऑक्सीजन मिळावा या हेतूने ही संकल्पना राबविली जाणार आहे.
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे 1 हजार 800 परवानाधारक व्यापारी आहेत, तर दुकानांची संख्या 1 हजार 200 इतकी आहेत. वृक्षारोपणाचा केवळ फार्स न करण्याच्या सूचनाही व्यापाऱयांना देण्यात आल्या आहेत. बाजार समितीकडून झाडे पुरविली जाणार आहेत. परवाना नुतणीकरणावेळी वाढलेल्या झाडाचा फोटो व्यापाऱयांना समिती प्रशासनाला दाखवावा लागणार आहे. यामुळे येणाऱया काळात बाजार समिती वृक्ष लागवडीच्या हिरवाईने नटलेली दिसणार आहे.
नैसर्गिक ऑक्जिसन मिळणार
सध्याची स्थिती पाहता झाडांची गरज आहे. कोरोना काळात ऑक्सिजन अभावी मोठी अडचण निर्माण झाली होती. बाजार समितीत वृक्ष लागवड आणि त्यांचे संगोपन करण्यात येणार असल्याने येणाऱया काळात नैसर्गिक ऑक्सिजन येथे येणाऱया प्रत्येकाला मिळणार आहे. – आमदार विजयकुमार देशमुख,, सभापती, बाजार समिती, सोलापूर