मुंबई / वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टीव्ह स्मिथ शनिवारी दिल्ली कॅपिटल्स संघात दाखल झाला असून येथे 7 दिवसांचे सक्तीचे क्वारन्टाईन त्याला पूर्ण करावे लागणार आहे. 31 वर्षीय स्टीव्ह स्मिथला यापूर्वी राजस्थान रॉयल्सने आपल्या संघातून मुक्त केले आाणि त्यानंतर फेब्रुवारीत झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने करारबद्ध केले. दिल्ली कॅपिटल्स संघाने स्मिथसाठी 2.2 कोटी रुपये मोजले आहेत.
‘स्टीव्ह स्मिथचे दिल्ली संघात स्वागत’, असे ट्वीट दिल्ली कॅपिटल्स संघाने शनिवारी केले. शिवाय, स्मिथचे गेटवे ऑफ इंडियावरील छायाचित्रही येथे शेअर केले. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सराव शिबिराला यापूर्वीच सुरुवात झाली असून स्मिथ व त्याचा राष्ट्रीय सहकारी मार्कस स्टोईनिस यांना मात्र अगदी कमी सरावाची संधी मिळणार आहे. दिल्ली कॅपिटल्सची या आयपीएल हंगामातील सलामीची लढत दि. 10 एप्रिल रोजी चेन्नई सुपरकिंग्स संघाविरुद्ध होणार आहे.
आधुनिक क्रिकेटमधील अव्वल दर्जाच्या फलंदाजांपैकी एक असणारा स्टीव्ह स्मिथ 2019 मध्ये राजस्थान रॉयल्स संघाशी करारबद्ध झाला असून युएईमधील 2020 च्या हंगामात त्याने संघाचे नेतृत्वही भूषवले. मात्र, त्यावेळी राजस्थानचा संघ शेवटच्या स्थानी फेकला गेला होता. यंदा दिल्ली संघाचे नेतृत्व यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतकडे सोपवले गेले असून रिकी पाँटिंग मुख्य प्रशिक्षक असणार आहे.