सणासुदीच्या दिवसात भारीतल्या कपडय़ांची खरेदी होत असते. लग्नाच्या निमित्तानेही वैविध्यपूर्ण पेहराव खरेदी केले जातात. लेहंगा चोली हा महिलांचा एक आवडता पेहराव. तुम्हीही सणावारासाठी लेहंगा चोली खरेदी करणार असाल तर स्वस्तात चांगला लेहंगा खरेदी करण्याच्या या खास टिप्स तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.
- एम्ब्रॉयडरीमुळे लेहंग्याची किंमत चांगलीच वाढते. म्हणूनच एम्ब्रॉयडरीवाल्या लेहंग्याऐवजी प्रिंटेड लेहंगा खरेदी करा. प्रिंटेड लेहंगाही खूप सुंदर दिसतो. ही छोटीही युक्ती करून तुम्ही काही हजार रुपये अगदी सहज वाचवू शकता. बनारसी सिल्क, ब्रोकेड लेहंगे हा खूप चांगला पर्याय ठरू शकतो.
- तुम्ही बॉर्डरवाला प्लेन लेहंगा निवडू शकता. आवडीनुसार लहान किंवा मोठी बॉर्डर निवडता येईल. अशा लेहंग्यावर हेवी दुपट्टा कॅरी करता येईल. अनेक फॅशन डिझायनर्स सध्या हा पर्याय निवडत आहेत.
- लेहंगा प्लेन किंवा बॉर्डरवाला असेल तर चोली थोडी हेवी ठेवता येईल. नक्षीकाम केलेली चोली खूप छान दिसेल. चोलीसाठी कमी कापड लागत असल्यामुळे तुमचे पैसेही वाचतील.
- एम्ब्रॉयडरीवाला लेहंगा नसेल तर काळजी करू नका. तुम्ही लटकनचा प्रभावी वापर करू शकता. बाजारात छान छान लटकन मिळतात. त्यांचा वापर करून लेहंग्याचा लूक खुलवता येईल. यामुळे तुमचे बरेच पैसे वाचतील.
- लेहंगा खरेदीला जाण्याआधीच त्याचा रंग आणि डिझाइन डोक्यात ठेवा. तुम्हाला नेमकं काय खरेदी करायचं आहे हे आधीच ठरवून घ्या. त्यामुळे गोंधळ उडणार नाही.
- लेहंग्यासोबतच त्याच्यासोबतची मॅचिंग ज्वेलरी खरेदी करा. तसंच बांगडय़ा आणि अन्य दागिन्यांची निवड करताना ते लेहंगा किंवा दुपट्टयात अडकणार नाहीत याची काळजी घ्या.