कॅनडात 70 वर्षीय महिलेला श्वास घेण्यास त्रास, डॉक्टरांकडून पहिल्यांदाच हवामान बदल शब्दाचा वापर
वृत्तसंस्था/ टोरंटो
कॅनडामध्ये 70 वर्षीय एका महिलेला हवामान बदल म्हणजेच क्लायमेट चेंजने पीडित पहिला रुग्ण मानले जात आहे. उन्हाळय़ात महिलेला श्वास घेण्यास त्रास सहन करावा लागला तसेच उष्णलाटेला तोंड द्यावे लागले. जून महिन्यात कॅनडात केवळ उष्णतेमुळेच सुमारे 500 लोकांचा मृत्यू झाल्याचे मानले जाते. काही दिवसांपूर्वी ग्लासगो येथे पार पडलेल्या सीओपी-26 हवामान परिषदेत जागतिक तापमान आणि असहय़ उष्णलाटांचा मुद्दा उपस्थित झाला होता.
कॅनडाच्या या महिलेचे नाव अद्याप उघड करण्यात आलेले नाही. या महिलेला हवामान बदलामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे हा आजार झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ब्रिटिश कोलंबियाच्या नेल्सनमधील इमर्जन्सी रुम डॉक्टर काएल मेरिट यांनी या महिलेवर उपचार केले आणि स्वतःच्या निदान तपशीलात स्पष्टपणे “या रुग्णाची समस्या आणि आजारामागे हवामान बदल कारणीभूत असल्याचे वाटण्याची ही 10 वर्षांमध्ये पहिलीच वेळ आहे’ असे नमूद केले आहे.
स्थिती बिघडत जाणार
आम्ही जर केवळ लक्षणांच्या आधारावर उपचार करत राहिलो आणि आजाराच्या मूळापर्यंत गेलो नाही तर स्थिती बिघडत जाणार आहे. आम्ही या प्रकरणी मागे पडत जाऊ असे डॉक्टर मेरिट यांनी म्हटले आहे. रुग्णाच्या या आजाराविषयी जून महिन्यातच कळले होते. त्यावेळी उष्णतेची लाट सुरू होती आणि तापमान 121 फॅरेनहाइटपर्यंत पोहोचले होते. देशातील स्थिती अत्यंत खराब होती. केवळ ब्रिटिश कोलंबियातच 500 जणांचा मृत्यू झाला होता. हवेची गुणवत्ता सर्वसाधारण स्थितीच्या तुलनेत 53 पट अधिक खराब झाली होती असे त्यांनी सांगितले आहे.
मधूमेह देखील..
महिलेला याचबरोबर मधूमेह देखील होता, ती एका ट्रॉलरमध्ये राहत होती आणि तिला हृदयविकार देखील होता, तिच्या वास्तव्याच्या ठिकाणी वातानुकूलन यंत्रणा नव्हती, तिला हायड्रेट ठेवणे देखील अवघड ठरले होते असे मेरिट यांनी म्हटले आहे.
नवी संघटना
नेल्सनमध्ये हे प्रकरण समोर आल्यावर डॉक्टर आणि नर्सेसनी प्लेनेटरी हेल्थ नावाची संघटना तयार केली आहे. सध्या यात 40 आरोग्य कर्मचारी सामील आहेत. या ग्रूपने स्वतःचे ट्विटर पेजही तयार पेल आहे. पर्यावरणाला होणारे नुकसान किंवा यात यामुळे उद्भवलेल्या स्थितीबद्दल लोकांनी गांभीर्य दाखविल्याचे वाटत नाही. मी या रुग्णावर उपचार केले आहेत, याचमुळे हवामान बदलाचे काय परिणाम असू शकतात हे मी सांगू शकतो असे मेरिट म्हणाले.