रिव्हॉल्व्हर मधून 5 राऊंड फायर
कोल्हापूर/प्रतिनिधी
दसरा चौक येथील शिक्षण संस्था आणि मालमत्तेच्या वादातून मानसिंग विजय बोंद्रे (रा. अंबाई टँक कॉलनी, फुलेवाडी) याने सोमवारी मध्यरात्री गोळीबार केला. अंबाई टॅंक येथील राहत्या घराच्या कंपवूड नजीक रिव्हॉल्वर मधून 5 राऊंड झाडले. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ करून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात मंगळवारी पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. या बाबतची तक्रार अभिषेक बोंद्रे याने जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.
याबाबत अधिक माहिती अशी की, बोंद्रे कुटुंबामध्ये दसरा चौक येथील एक शिक्षण संस्था आणि शेत जमिनी आणि इतर मालमत्तांच्या कारणावरून वाद सुरू आहे. या वादातून सोमवारी रात्री 12.30 वाजण्याच्या सुमारास मानसिंग बोंद्रे याने अभिषेक बोंद्रेला आणि तुझ्या खानदानला संपवितो, तुझा गेम करतो’ अशी धमकीही मानसिंग बोंद्रे यांनी दिल्याचे अभिषेक बोंद्रे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. संशयित मानसिंग बोंद्रे यांचा शोध घेण्यात येत आहे. लवकरच त्यांना अटक करण्यात येईल, असे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी सांगितले.