अनाथ हिमबिबटय़ाची आईप्रमाणे घेतली काळजी
वन्यप्राण्यांना लोक घाबरतात, जंगलात शिरताच प्रत्येकाच्या मनात वन्यप्राण्यांबद्दल भीती जागृत होते. परंतु वन्यप्राणी देखील प्रेमाचे भूकेले असू शकतात. हेच दर्शवून देणारी पाकिस्तानातील एक व्यक्ती आणि हिमबिबटय़ाची प्रेमकहाणी जगासमोर आली आहे.
लियो अन् कमालची कहाणी
कमाल हे गिलगिटमध्ये राहणारे एक मेंढपाळ आहेत. त्यांना तेथून 35 किलोमीटर अंतरावर एक हिमबिबटय़ा मिळाल होता. त्यावेळी त्याचे वय केवळ 7 आठवडय़ांचे होते. त्यांनी त्या अनाथ हिमबिबटय़ाला सोबत आणून त्याची देखभाल सुरू केली. पाकिस्तान जियोग्राफिक फेसबुक पेजवर त्यांची कहाणी शेअर करण्यात आली आहे.
तो अत्यंत आजारी होता
या हिमबिबटय़ाचे नाव कमाल यांनी लियो ठेवले होते. लियो प्रारंभी खूपच आजारी होता. देखभाल घेतल्यावर त्याची प्रकृती सुधारू लागली. काही दिवसातच लियो आणि कमाल यांच्यात चांगली मैत्री झाली. कमालच्या देखरेखीत त्याचे वजन वाढून 25 किलो झाले.
16 महिने राहिले सोबत
लियो आणि कमाल 16 महिन्यांपर्यंत सोबत राहिले. कमाल त्याची पूर्ण काळजी घ्यायचे, तो त्यांच्यासोबत खेळायचा. पण पुढील काळात लियोला पाकिस्तान सरकारच्या स्वाधीन करावे लागले. ब्रीडिंग प्रोग्राम अंतर्गत पाकिस्तान सरकारने त्याला अमेरिकेच्या ब्रॉन्क्स प्राणिसंग्रहालयात पाठविले. हिमबिबटय़ा हा अत्यंत दुर्मीळ प्राणी आहे. त्यांची संख्या वाढविण्यासाठी त्याला तेथे पाठविण्यात आले होते.
पुस्तक प्रकाशित
लियो आणि कमाल यांच्या कहाणीवर एक पुस्तक लिहिले गेले आहे. या पुस्तकाचे नाव ‘लियो, द स्नो लिपर्ड ः द ट्रू स्टोरी ऑफ ऍन अमेझिंग रेस्क्यू’ असे आहे.