महाराज…. प्रौढप्रतापपुरंदर, सिंहासनाधीश्वर, क्षत्रियकुलावतंस, महाराजाधिराज शिवछत्रपती महाराज…. अशी आर्त हाक त्यांच्या व्याख्यानात आली की आता साक्षात नजरेसमोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहणार आहेत…. मनाच्या पटलावर त्यांचं स्वराज्य चितारलं जाणार आहे…. वीरश्री संचारलेला तो महाराष्ट्र जिवंत होणार आहे आणि दहा दिशातून एकच आवाज घुमणार आहे….. छत्रपती शिवाजी महाराज! याची खात्री पटायची. हजारो हृदये धडधडायची. देशप्रेमाने भारायची. देव, देश आणि धर्मासाठी प्राणपणाने लढण्याची शपथ घ्यायची. ‘हर हर महादेव’ असा जयजयकार करत गडकोटांवर धावायची. स्वराज्य कसं असेल त्याचा ठाव घ्यायची. आयुष्याच्या उमेदीच्या काळात पुढच्या जगण्याची रीत ठरवायची आणि एका ध्येयाने चालू लागायची. अडखळला रस्ता तर राजा शिवछत्रपती ग्रंथाची पाने चाळायची. नव्या उमेदीनं धावायला लागायची. पुन्हा पुन्हा तो इतिहास त्याच परिचित वाणीतून ऐकायला हजारोंच्या संख्येने जमायची. ती वाणीही त्यांच्या सारखीच कोवळी होती. विशीत असताना एखादी शिळ फुंकावी तशा गोडसर आवाजातली ती ललकारी घुमता घुमता प्रगल्भ बनली. कोवळय़ा चेहऱयावरील ती निमुळती दाढी, ते जॅकिट महाराष्ट्राच्या परिचयाचे बनले. ते शिवशाहीर म्हटले जाऊ लागले. दिवसागणिक तो आवाज भारदस्त बनत गेला- गगनभेदी झाला! त्या कंठातून बाहेर पडणारी ललकारी आता सह्याद्री इतकी भारदस्त बनली. जगभर घुमली. नामवंत बनली…. तो काळ आज इतिहास जमा झाला. या इतिहास नावाच्या विशाल कालपटात कोळसा आहे आणि चंदनही! काय उगाळायचं आहे ते तुम्हाला ठरवायचं आहे…. मी आयुष्यभर चंदन उगाळलं….! असं ‘तो’ इतिहास मनामनात जिवंत करणारे ‘ते’ सार्थ अभिमानाने सांगायचे! त्या सांगण्याला जोड होती 74 वर्षांच्या तपश्चर्येची आणि शंभर वर्षांच्या आयुष्याची! नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे आणि कार्य शिवरायांचा अवघा मुलुख जाणतोच…..! जाणता राजांच्या आयुष्याकडं बघायची ज्यांनी जाण दिली ते हे शिवशाहीर…. महाराष्ट्र भूषण…पद्मविभूषण….! आता आई भवानीच्या दरबारात एकनाथांच्या ‘दार उघड बये’चा घोष करीत आपली शिवभक्ती साक्षात शिवरूपात विलीन करण्यास अस्ताच्या मार्गाने चालू लागले आहेत…. सह्याद्रीचा घोंगावणारा वारा आज कडेकपारीतून प्रदक्षिणा घालत मुद्दामहून वैकुंठाच्या मार्गाला आला असेल…. चलावं आमच्यासवे…. असा आग्रह त्यांनी त्या चैतन्यरुपाला केला असेल. कीर्तीपताका रोवून, अचेतन देहाचा त्याग करून ते चैतन्यरुप आज बिगीने धावले असेल…. काळाच्या पाऊलखुणांना मागे सारत….! तुकोबांचे शब्द अखेरचे मुखात असतील…. आम्ही जातो आमुच्या गावा, आमुचा राम राम घ्यावा…. तिकडे पैलतीरावर थांबले असेल शिवछत्रपतींचे चैतन्यरुप, अगदी बाहू पसरवून! आयुष्यभर ज्या नावाची जपमाळ केली…. एका अनामिक वेडाला उराशी बाळगत. अवघ्या स्वराज्यातील प्रत्येक गडकोटांची भूमी वेडय़ासारखी पायी तुडवली, हालअपेष्टा सोसत, प्रसंगी उपाशी रहात ती पदभ्रमंती सुरु होती, शिवराय जाणून घेण्यासाठी. त्याच ओढीतून वयाच्या अवघ्या बाविसाव्या वषी राजगड ते आग्रा पायी वारी केली….अगदी वेडा बनून…. इतिहासानं झपाटून टाकलं होतं ते जन्मापासूनच. ते झपाटलेपण टिकले अगदी सरणापर्यंत…! सगळेच अंतिमक्षणी ‘राम’ म्हणतात…. ते तेव्हाही ‘शिवराय’च म्हणाले असतील…. इतकी त्या नावावर नि÷ा! त्या नि÷sने जमवलेले ज्ञान जगाला समजावण्यासाठी इतिहास आणि भूगोलाची मांड पक्की करत, त्याला ऐतिहासिक कागदपत्रांची जोड देत, मराठी लोककलेची किनार जोडत त्यांनी एक कवन रचले. त्याला महानाटय़ रुप दिले. जाणता राजा नावाने….! चारशे जणांचा संच, हत्ती, घोडे, उंट, बहुमजली रंगमंच आणि प्रेक्षकांच्या डोळय़ासमोर उभा केला शिवपूर्वकाल…. अन्याय, अत्याचाराने होरपळलेली, स्वकियांनाच मारून मरणारी मराठी माती. त्या मातीची माय भवानीला आर्त हाक. जिजाऊंची ती तेजस्वी मुद्रा, चारही शाह्यांना पालथा घालणाऱया पुत्राची आस आणि शिवजन्म! पुणवडीचा उध्दार, उन्मत्तांना शासन, स्वराज्याची शपथ, मावळय़ांची शर्थ, अफजल, शाहिस्ते खानाची फजिती, संकटात स्वराज्यासाठी घरादारावर पाणी सोडायला तयार मावळे, सुरतेची लूट, परधर्म, पर स्त्रीचा आदर, आणि सर्वात कळस म्हणजे राज्याभिषेक! साक्षात डोळय़ासमोर उभा राहणारा भव्य शिवकाल! राष्ट्र निर्मितीची आणि स्वातंत्र्याची आस असणाऱया प्रत्येकाला जबाबदार बनवणारे हे सर्व कलांचा संगम असणारे महानाटय़. निर्मितीच अशी भव्यदिव्य, की डोळेच नव्हे आयुष्य दिपून जावे! हजारो-लाखो नव्हे कोटय़वधींच्या मनावर अधिराज्य करणारे ते महानाटय़. इतकेच तेजस्वी राजा शिवछत्रपती हे चरित्र. त्यातील दीनानाथ दलालांची चित्रे. स्वराज्यातील सर्वसामान्यांच्या आशा-आकांक्षा आणि धडपडीचे प्रतीक शेलार खिंड! एकेक कथा आणि प्रसंग माणसांचं आयुष्य समृद्ध करणारे! सह्याद्रीच्या काळय़ा पत्थराच्या अंगावरही रोमांच उभे रहावे अशा धारदार, ओजस्वी वाणीतून साकारले जाणारे शिवआख्यान. हे आख्यान ते देत होते, स्वातंत्र्याच्या हुंकाराचा मोठा आवाज बनावा म्हणून. थिटय़ा महत्वाकांक्षेला मोठी झेप घेण्याची प्रेरणा मिळावी म्हणून. युवकांना वेड लागावं राष्ट्रभक्तीचं म्हणून. करमणूक म्हणून कोणी त्यांना ऐकू नये तर बोध घ्यावा. व्यक्ती-संस्था-राष्ट्र उभे करणारे घडावेत म्हणून! शिवराय हे साम्राज्यवादी, इस्टेट बिल्डर नव्हते तर नेशन्स बिल्डर होते हे समजावं आणि मावळा बनून त्यांचं लोककल्याणकारी स्वराज्य सर्वांनी लोकशाहीतही जपावं म्हणून…! त्यासाठी शंभर वर्षांचं एक आयुष्यही पुरत नाही, हेच सांगून ते निघून गेले. घोंघावते वारे सह्याद्रीच्या दरीखोऱयातून बाहेर पडले, जगाच्या पोकळी बाहेर…. अनंतात….अनंत बनलेल्या त्यांना हा अखेरचा दंडवत!
Previous Articleशहर विकासासाठी आठ दिवसांत 5 कोटींचा निधी
Next Article खेडच्या संपात एसटी कर्मचाऱयांनी गायले भजन-कीर्तन
Related Posts
Add A Comment