प्रतिनिधी /बेळगाव
बाजारपेठेतील सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी घालण्यात आलेल्या डेनेज वाहिन्या ठिकठिकाणी तुंबल्या आहेत. त्यामुळे देशपांडे गल्ली आणि बसवाण गल्ली परिसरात डेनेज तुंबण्याची समस्या सातत्याने निर्माण झाली होती. अखेर या दोन्ही गल्लीतील डेनेज वाहिन्या बदलण्याचे काम सुरू करण्यात आले असून रविवारी हे काम करण्यात आले. त्यामुळे रहिवाशांतून समाधान व्यक्त करण्यात आले.
बसवाण गल्ली परिसरातील डेनेज वाहिनी मागील 2 वर्षापासून तुंबण्याची समस्या निर्माण झाली होती. सतत तक्रारी वाढल्या होत्या. महापालिकेकडे दररोज एक तरी तक्रार करण्यात येत असल्याने चार दिवसाआड सकिंग मशीनने डेनेज चेंबर व डेनेज वाहिनी स्वच्छ करण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. पण या समस्येचे निवारण तात्पुरते होत असे. काही दिवस गेल्यानंतर पुन्हा डेनेज वाहिन्या तुंबून नागरिकांच्या स्वच्छतागृहात सांडपाणी तुंबून रहात होते. तसेच येथील सांडपाण्याचा निचरा होत नसल्याने डेनेज चेंबर ओव्हरफ्लो होऊन सांडपाणी गटारीमधून वाहत होते. तसेच देशपांडे गल्ली परिसरात देखील ड्रेनेज तुंबण्याची समस्या निर्माण झाली होती. सलग दोन वर्षे याबाबत महापालिकेकडे तक्रारी करण्यात येत होत्या. अखेर महानगरपालिकेने दोन्ही गल्लीतील डेनेजवाहिन्या बदलण्याचा निर्णय घेऊन काम सुरू केले आहे.
बसवाण गल्ली ते नरगुंदकर भावे चौकपर्यंतच्या डेनेजवाहिन्या नव्याने घालण्याचे काम पूर्ण झाले आहे. सध्या डेनेज चेंबर बांधण्यात तसेच डेनेज जोडणी करून देण्याचे काम सुरू आहे. त्याचप्रमाणे रविवारी लॉकडाऊन असल्याने बाजारपेठेतील गर्दी आणि वाहतूक बंद झाली होती. त्यामुळे देशपांडे गल्ली व बसवाण गल्लीतील डेनेजवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आल्याने रहिवाशांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.