वेणुग्राम किंवा वेळुग्राम म्हणजेच बांबूचे गाव. समुद्रसपाटीपासून 762 मीटर उंचीवरील, अरबी समुद्रापासून 100 कि. मी. दूर उत्तर अक्षांश 15अंश-23’ ते 16अंश-56अंश पूर्व रेखांश 74अंश-53’ ते 75अंश-28’ वर वसलेले, मुंबई-बेंगळूर व गोवा-विजापूर यांच्या केंद्रस्थानी असलेले शतवाहनांच्या ऐन उमेदीतले भरभराटीचे सुपीक आणि सुंदर शहर, कोंदणात बसवलेल्या हिऱयाप्रमाणे, दिवा- मशालीच्या प्रकाशात लुकलुकणारं बांबूच्या बेटांच्या देखण्या स्वरूपामुळे वेणुग्राम ही बिरूदावली मिरवणारं पूर्वाश्रमीचे वेणुग्राम म्हणजेच आताचे बेळगाव शहर, त्या काळातला इंग्रज प्रवासी फिंच याने आपल्या डायरीत वेणुग्राम मोठे शहर असून तेथे हिरे, माणिक, नील, पाचू वगैरेसारख्या रत्नांचा मोठय़ा प्रमाणात व्यापार चालत असल्याची नोंद केली आहे. रणांगणातील वीर योद्धय़ाच्या अंगाखांद्यावर मिरवणारे एकेक घाव म्हणजेच पुरूषार्थाचा दागिना. हाच दागिना चकाकी करण्याचा हा प्रामाणिक प्रयत्न. वेणुग्राम वीराच्या अंगाखांद्यावर खेळणारे शेकडो घाव मोजण्याचा हा अल्पसा प्रयत्न.

गेल्या दीड एक हजार वर्षात बेळगाव परिसरावर राष्ट्रकुट, रट्ट, शिलाहार, विजयनगर, देवगिरीचे यादव, बहामनी, निजाम, विजापूरची आदिलशाही, मोंगल, मराठे, ब्रिटीश यासारख्या अनेक राजवटींची सत्ता होती. रट्टांच्या पूर्वी पैठणचे सातवाहन, चालुक्मय, गोव्याचे कदंब यांनी राज्य केल्याचे कळते. 16 व्या शतकाच्या आसपास कित्तूरचे देसाई, बेळवडी, शिरसींगी, वंटमुरी वगैरेंची काही काळापुरतीच वेणुग्रामवर सत्ता होती. या प्रदेशावर राज्य करणाऱया शिलाहार आणि रट्ट वंशीय राज्यांच्या शिलालेखात आणि ताम्रपटात इ.स.1040 पूर्वीपासून वेणुग्राम असे नाव आढळून येते आणि त्यानंतरच्या काळात बेळगाव असे नामकरण झाल्याचे दिसते. बेळगावचे एक हजार वर्षापासूनचे नाव वेणुग्राम सिद्ध करणारा सर्वात जुना पुरावा हा 1040 सालातील रायबाग येथे सापडलेला शिलालेख असून, रट्ट राजा कार्तविर्यच्या कारकिर्दीतील आहे. सध्या तो कोल्हापूर येथील लक्ष्मी विलास पॅलेसमध्ये आहे. या शिलालेखाच्या 15 व्या ओळीमध्ये कार्तविर्य वेणुग्राममधून राज्य करीत असल्याचा उल्लेख आहे. शिलाहार गंडरादित्य याने कार्तिक शुद्ध शके 1037 मन्मकनाम संवत्सरे म्हणजेच 27 ऑक्टोबर 1115 रोजी दिलेल्या ताम्रपटात वेणुग्रामचा उल्लेख आहे. इ. स. 1160 च्या सुमारास गोवा प्रांतावर कदंबांचे राज्य असताना त्यांच्याही एका लेखात वेणुग्रामचा उल्लेख आढळतो.
इ. स. पूर्व 225 ला जक्कदेवाचे राज्य वेणुग्रामवर होते. इ. स. पूर्व 30 ते 300 पर्यंत हे शहर पैठणच्या आधिपत्याखाली होते. या भागाला कुंतलाचा भागदेखील म्हणत असत. शतवाहनांच्या पतनानंतर चंदोरच्या भोजांची सत्ता इ. स. 300 ते 345 पर्यंत वेणुग्रामवर होती. इ. स. 345 ते 540 गोवा कदंबांची राजधानी वेणुग्राम आणि त्यानंतर बनवाशीच्या कदंबांचे राज्य वेणुग्राम व उपराजधानी हलशीवर होती. कदंबांची सार्वभौम सत्ता ही कर्नाटक, गोवा, अधिकतर महाराष्ट्र राज्यावर होती. नंदगड जवळील हलशी उर्फ पलशिखा ही त्यांची राजधानी होती. मयुरा वर्मन हा कदंबांचा पहिला राज्यकर्ता, 540 इ. स. पूर्व च्या दरम्यान कदंबांचे राज्य बदामीच्या पुलकेशीकडून संपुष्टात आले.
इ. स. 540 ते 753 पर्यंत बदामीच्या चालुक्मयांची सत्ता होती. 753 ला राष्ट्रकुटांमुळे बदामीच्या चालुक्मयांचे राज्य संपुष्टात आले. आणि 753 ते 973 इ. स. पर्यंत मालखेडच्या राष्ट्रकुटांची सत्ता होती. राष्ट्रकुट प्रथमतः सौंदत्तीवरून राज्यकारभार करत होते. त्यानंतर त्यांनी वेणुग्रामला आपली राजधानी बनवली. इ. स. 12 व्या शतकात कल्याण चालुक्मयांची सत्ता आली. इ. स. 1204 मध्ये वेणुग्रामचा भुईकोट किल्ला व चालुक्मय शैलीतील कमल बस्ती या जैन मंदिराची निर्मिती रट्ट सरदार बिची राजा याने केली. रट्टांची इ. स. 1210 पे 1250 पर्यंत भुईकोट किल्ला राजधानी होती.
इ. स. 1250 साली देवगिरीच्या यादवानी रट्टाना हरवून वेणुग्रामवर कब्जा केला. शिवाय 1264 साली गोव्याचे कदम व रट्टाना आपल्या अंमलाखाली ते आणले. इ. स. 1310-11 ला दिल्लीच्या अल्लाउद्दीन खिलजीने मलिक काफर नामक सरदाराला दिल्लीहून पाठवून हसन जिल्हय़ातील होयसळांची राजधानी बल्लाळला जिंकून मोठी लूट घेऊन तो दिल्लीस परतला. इ. स. 1312 मध्ये पुन्हा देवगिरीला येऊन सेऊना शंकरदेवाचा वध करून 1313 साली तो बेळगावला आला. इ. स. 1336 मध्ये विजयनगर राज्यकर्त्यांनी पुन्हा बेळगाव काबीज केले. इ. स. 1347 मध्ये अल्लाउद्दीन हसनने बहामनी राज्याची स्थापना केली. इ. स. 1472 ला महंमद तुघलकने बेळगाव भाग जिंकून घेतला. मात्र किल्ला व सभोवतालचा परिसर एका हिंदू सरदारच्या ताब्यात राहिला. 1474 साली महंमदशहा बहामनीच्या सुलतानने महंमद गवाण या वजीराच्या साथीने हा किल्ला जिंकून घेतला व या प्रदेशाचा कारभार सांभाळण्याची जबाबदारी महंमद गवाणाकडे सोपवली. 1518 मध्ये बहामनी राज्याची पाच शकले झाल्याचा फायदा आदिलशहाने घेतला व बेळगाव भाग आदिलशहाच्या कब्जात आणला. आदिलशहाने खुश्रुतूर्क उर्फ आसदखान नावाच्या इराणी सरदारला सुभेदारी देऊन त्याच्याकडे कारभार सोपवला. त्याने 1549 पर्यंत कारभार पाहिला. 1473 मध्ये जमिनीखाली सुरूंगासाठी गनपावडर वापरून महंमद गवाण आणि युसूफ खानने बेळगाव किल्ला जिंकला. याप्रसंगी महंमद हा जातीनिशी हजर होता. 1518 च्या नंतरच्या काळात किल्ल्याला भक्कम तटबंदी बांधून खोल खंदक खोदण्यात आला. किल्ल्यातील सफा मस्जिद व इतर बांधकाम हे 1519 च्या काळातले आहे. या कामी आदिलशाही सरदार याकुब अलीखान याचे योगदान महत्वाचे आहे. इ. स. 1550 मध्ये विजापूरचा सरदार शेरखानने शहापूर बसविले. त्याचे पूर्वीचे नाव शहापेठ असे होते. इ. स. 1656 ला सिद्दी रेहाणला बेळगावची जहागिरी मिळाली. 1674 मध्ये रायगडवर राज्याभिषेकानंतर छत्रपती शिवाजी राजानी दक्षिण मोहिम हाती घेतली. आणि वेणुग्राम शहापूर जिंकून हुबळीस प्रयाण केले. वाटेत सौंदत्ती जवळील रट्टांचा पारसगड किल्ला दुरूस्त केला व हुबळीचा किल्ला बांधला. महाराजानी बेळगाव परिसरात पारगड, भा rमगड, वल्लभगड, राजहंसगड, महिपाळ गड, कलानंदिगड आणि पवित्रगड यासारख्या लहान मोठय़ा अनेक गडांची उभारणी केली. 1686 मध्ये औरंगजेबाचा सरदार शहाजादा आझम याने विजापूरच्या सल्तनेतचा पराभव करून किल्ला ताब्यात घेतला. 1707 ला औरंगजेबच्या मृत्यूनंतर मुगल साम्राज्याला उतरती कळा लागली. मग हा किल्ला मराठय़ांच्या अंमलाखाली आला. परंतु काही दिवसाकरीता हा किल्ला हैदरने जिंकून घेतला. परंतु लगेचच पेशव्यानी हैदर अलिकडून हा किल्ला हिसकावून घेतला.

सन 1719 मध्ये पहिले पेशवे बाळाजी विश्वनाथ भट यांना दिल्लीच्या बादशहाने महाराष्ट्रातील मराठय़ांची सनद, दक्षिणेतील मोंगली मुलुखाची चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे हक्क दिले होते. खंडणी वसुलीसाठी अक्कलकोटचे राजे फत्तेसिंग भोसले यांची नेमणूक केली होती. 1720 मध्ये बाळाजी पेशव्यांच्या मृत्यूनंतर हैद्राबादचा निजाम उल्मुकने बेळगाव किल्ला ताब्यात घेतला, त्यानंतर पेशव्यानी भुईकोट किल्ला आपल्या अंमलाखाली आणला. तेव्हापासून ब्रिटिशांची सत्ता येईपर्यंत म्हणजेच जवळपास 62 वर्षे हा भुईकोट किल्ला व वेणुग्राम उर्फ बेळगाव शहर पेशव्यांच्याच हाती राहिला. पेशव्यांनी हा किल्ला व त्याभोवतालीचा चाळीस हजार उत्पन्नाच्या भूप्रदेशावर देखरेख करण्यासाठी सदाशिवराव पंडित यांची नेमणूक केली असल्याचे समजते. मराठय़ांच्या शौर्याचे वर्णन करताना इटलीचा प्रवासी मनूची लिहितो ‘अधिकतर मुघल सरदारांना मराठा सैनिकांकडून चिरशांती लाभते. मराठय़ांच्या मोहिमेदरम्यान दरवषी जवळपास एक लाख मोंगल सैनिकांना युद्धात जीव गमवावा लागतो.
ब्रिटीश जनरल मुनेरोने दि. 20/3/1818 ला बेळगाव शहर जिंकले व त्यानंतर 22 दिवसांच्या प्रतिकारानंतर 12 एप्रिल 1818 ला किल्ल्यावर कब्जा केला. त्यानंतर भारत स्वतंत्र होईपर्यंत म्हणजेच 15 ऑगस्ट 1947 पर्यंत त्यांच्याच ताब्यात होता. किल्ला जिंकल्यावर ब्रिटीशांनी बेळगावचा समावेश धारवाड जिल्हय़ात केला. परंतु नंतर बेळगाव शहराचे मध्यवर्ती स्थान व महत्व लक्षात घेऊन 1836-37 या काळात जिल्हय़ाचे मुख्य ठिकाण करून त्याचा बेळगाव स्वतंत्र जिल्हा बनला. (पूर्वार्ध)
-संकलन : मधू पाटील, कंग्राळी खुर्द