अर्जुनवीर श्री साई सोशल उपविजेते, वैभव कुरूबागी मालिकावीर, हार्दिक ओझा सामनावीर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
हार्दिक ओझा व ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआयच्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर व पावसाच्या व्यत्ययामुळे डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारे ऍक्सेस डेव्हलपर्सने अर्जुनवीर श्री साई सोशल संघाचा पराभव करून मोहन मोरे बीपीएल टी-20 चषक पटकाविला. हार्दिक ओझा सामनावीर, वैभव कुरूबागी मालिकावीरासह दुचाकी वाहनाचा मानकरी ठरला.
युनियन जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या अंतिम सामन्यात अर्जुनवीर श्री साई सोशल संघाने 17.5 षटकात सर्वबाद 116 धावा केल्या. अर्जुनवीर संघाला पहिल्याच षटकाच्या पहिल्या चेंडूवर सुजय सातेरीला हार्दिक ओझाने त्रिफळाचित करून धक्का दिला. त्यानंतर दुसऱया षटकात सुशांत कोवाडकरने अमेय भातकांडेला त्रिफळाचित करून 2 बाद 6 अशी केविलवाणी स्थिती केली. त्यानंतर सुदीप सातेरी व केदार ऊसुलकर यांनी 30 धावांची भागीदारी करीत थोडाफार डाव सावरला. पण नंतर पुन्हा पडझड झाली आणि 7 बाद 52 अशा स्थितीनंतर शुभम भादवणकर व शुभम गौंडवाडकर यांनी आठव्या गडय़ासाठी 54 धावाची भागीदारी केली. ही जोडी फुटल्यानंतर त्यांचा संघ 116 धावात गारद झाला. शुभम भादवणकरने 2 षटकार 5 चौकारासह 40, शुभम गौंडवाडकरने 1 षटकार 1 चौकारासह 19, सुदीप सातेरीने 2 चौकारासह 20 व केदार उसुलकरने 12 धावा केल्या. ऍक्सेस डेव्हलपर्सतर्फे ज्ञानेश होनगेकरने 1 धावेत 2, ताहीर सराफने 14 धावात 2, हार्दिक ओझाने 27 धावात 2 तर सुशांत कोवाडकर, संदीप चव्हाण, झिनत एबीएम यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.

प्रत्युत्तरादाखल खेळताना ऍक्सेल डेव्हलपर्सने 5.3 षटकात 2 बाद 38 धावा केल्या असता मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने सामना थांबवावा लागला व नंतर तो रद्द करण्यात आला. डकवर्थ-लुईस नियमानुसार 5.3 षटकात ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघाची धावसरासरी सरस असल्याने ऍक्सेस डेव्हलपर्स संघाला विजयी घोषित करण्यात आले. ऍक्सेस डेव्हलपर्सतर्फे झिनत एबीएमने 2 चौकारासह नाबाद 16, रविचंद्र उकलीने 10 धावा केल्या. अर्जुनवीर श्री साई सोशलतर्फे अनिलगौडा पाटीलने 17 धावात 2 गडी बाद केले.

प्रमुख पाहुणे एडीएमएस ई बाईकचे सीईओ मनिष गोंधळी, के. एन. कावीलकर, मारूती चौगुले, मिहीर पोतदार, निशिल पोतदार, सचिन पेडणेकर, जिमखानाचे अध्यक्ष चंद्रकांत बांडगी, सचिव प्रसन्ना सुंठणकर, संजय मोरे, प्रकाश पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते विजेत्या ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघाला व उपविजेत्या अर्जुनवीर श्री साई सोशल संघाला आकर्षक चषक, रोख रक्कम देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर हार्दिक ओझा (ऍक्सेस), उत्कृष्ट झेल सुशांत कोवाडकर (ऍक्सेस), इम्पॅक्ट खेळाडू शुभम भादवणकर (अर्जुनवीर), उत्कृष्ट फलंदाज सुजय सातेरी (अर्जुनवीर), उत्कृष्ट गोलंदाज आनंद कुंभार (मोहन मोरे), स्पर्धेतील इम्पॅक्ट खेळाडू सुशांत कोवाडकर (ऍक्सेस), स्पर्धेतील आश्वासक खेळाडू सुदीप सातेरी (अर्जुनवीर), फेअरप्ले पुरस्कार विजेता संघ मोहन मोरे यांना गौरविण्यात आले.
मालिकावीर वैभव कुरूबागीला दुचाकी वाहन मान्यवरांच्या हस्ते देवून गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून संजय कुलकर्णी व संजय रोकडे (हुबळी) तर स्कोअरर म्हणून रवी कणबर्गी यांनी काम पाहिले. स्पर्धेचे समालोचन प्रमोद जपे, आरिफ बाळेकुंद्री, चेतन बैलूर यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माजी रणजीपटू मिलिंद चव्हाण, परशराम पाटील, महांतेश देसाई, ग्राऊंड्समन अनिल गवी यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करुन चेतन बैलूर यांनी आभार मानले.