साडेतीन तासातच काम केले पूर्ण; अजित गावकर यांनी क्रीडा सचिव, सागच्या कार्यकारी संचालकाना पाठविला व्हिडियो

क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
क्रिकेट प्रशिक्षणार्थी पालकाच्या एका व्हिडियोने फातोर्डा क्रिकेट सराव मैदानावरील कित्येक वर्षे न सुटलेला गुंता सोडविला असून, आता येथील सराव खेळपट्टीवर युवा आणि प्रोफेशनल क्रिकेटपटू सरावासाठी येताना दिसणार आहे. गेली कित्येक वर्षे फातोर्डा सराव मैदानावर क्रिकेटचे प्रशिक्षण केंद्र बंद होते. यामुळे येथील सीनियर क्रिकेट प्रशिक्षक संदीप नाईक काही निवडक क्रिकेटपटूंना घेऊन मडगावच्या एमसीसीवर सरावासाठी जायचे. राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या आयोजनाच्या किंवा जलतरण तलाव दुरूस्तीच्या नावावर हे क्रिकेट केंद्र कित्येक वर्षे बंद होते.
किमान सरावासाठी असलेल्या खेळपट्टींची डागडूजी करून यावर क्रिकेटपटूंना प्रशिक्षण घेण्यासाठी तरी सोय व्हावी, यासाठी क्रिकेट प्रशिक्षक संदीप नाईक आणि क्रिकेट प्रशिक्षणार्थ्यांच्या पालकांनी यांनी कित्येक वेळा गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई, क्रीडा खात्याचे संचालक तसेच क्रीडामंत्री बाबू आजगावकर यांनाही साकडे घातले. क्रिकेटपटूंच्या पालकांनी फातोडर्य़ाचे आमदार विजय सरदेसाई आणि माजी आमदार दामू नाईक यांनीही सांगून पाहिले, मात्र काहीच झाले नाही.
शेवटचा उपाय म्हणून एका प्रशिक्षणार्थीचे पालक अजित गावकर यांनी आपल्या मुलांला रोज एमसीसीवर नेण्यासाठी कसरत करावी लागते, यासाठी वैतागून फातोर्डा सराव मैदानावर असलेल्या क्रिकेट खेळपट्टय़ांची दयनीय अवस्थेताचा व्हिडियो 29 ऑक्टोबर रोजी राज्याचे क्रीडा सचिव अशोककुमार आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाईना यांना पाठविला. हा व्हिडियो व्हायरल होताच क्रीडा खाते आणि प्रामुख्याने गोवा क्रीडा प्राधिकरणाला जाग आली. क्रीडा सचिव अशोककुमार आणि व्ही. एम.प्रभुदेसाई यांनी सबंधित अधिकाऱयाला झाडल्यानंतर केवळ साडेतीन तासांनी फातोर्डा क्रिकेट खेळपट्टी चकाचक झाली.
केवळ आयएसएल फुटबॉल स्पर्धेचा ध्यास घेणारे फातोर्डा स्टेडियमचे व्यवस्थापकही ताडकन जागे झाले व त्याच दिवशी दुपारी 2 वाजता सर्व सामग्री घेऊन केवळ आयएसएल फुटबॉल स्पर्धेच्या आयोजनासाठी तैनात करण्यात आलेले कर्मचारी क्रिकेट सराव खेळपट्टीवर हजर झाले. केवळ साडेतीन तासात या कर्मचाऱयांनी युद्धपातळीवर काम केले आणि परिसर स्वच्छ केला. झाडांनी, वेलीनी झापलेल्या क्रिकेट खेळपट्टीने अखेर कैक वर्षांनी या वॉकिंग टॅकरवर वॉकींग करताना माणसांना पाहिले. खेळपट्टीला दिवाळीसाठी सजविण्याचे काम सुरू असल्याची वार्ता क्रिकेटपटूंच्या पालकांना समजली आणि पालक आपल्या मुलांना खेळपट्टीवर घेऊनही आले.
फातोर्डा स्टेडियमवर अनेक व्यवस्थापक आले. मात्र सर्वजण फुटबॉलच्याच प्रेमात पडले. सध्या कार्यकारी संचालक असलेले व्ही. एम. प्रभुदेसाई हे स्टेडियम व्यवस्थापक असताना क्रिकेटपटूंना कोणीतरी एक वाली होता. मात्र त्यांचे प्रोमोशन झाल्यानंतर इथं आलेले सर्व स्टेडियम व्यवस्थापक केवळ फुटबॉलच्याच प्रेमात पडले आणि त्यांनी बाकी सर्व खेळांची वाट लावल्याची प्रतिक्रिया काही पालकांनी दिली.
फातोर्डावरील मडगाव क्रिकेट आरसीसी 2000 पासून कार्यरत आहे. या एकमेव क्रिकेट आरसीसीने गोव्याला एकत्रित 200 हून अधिक रणजी सामने खेळलेले रणजीपटू दिले आहेत. मागील दहा वर्षांपासून या आरसीसीवरून राज्यासाठी खेळणाऱया क्रिकेटपटूंचा स्त्रोत कमी झाला आहे व यासाठी जबाबदार क्रीडा खाते, गोवा क्रीडा प्राधिकरण आणि क्रिकेटपटूंना असलेली साधनसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी असमर्थ ठरलेले स्टेडियम व्यवस्थापक राहिलेले आहेत, असे एक पालक म्हणाले.
या स्टेडियमवर असलेले व्यवस्थापक महेश रिवणकर हे एक अतिशय कार्यतत्पर अधिकारी असल्याचे त्यांची ख्याती आहे. मात्र त्यांच्यावर अनेक जबाबदाऱया आहेत. एक कार्यक्षम अधिकारी असल्याने त्यांना कधी कधी साग आणि क्रीडा खात्यातील गुंता सोडविण्यासाठी पणजी व बांबोळीला जावे लागते आणि वरिष्ठांना मार्गदर्शनही करावे लागते. मात्र त्यांना असे करावे लागत असल्याने स्टेडियमच्या व्यवस्थापनावर परिणाम होतो. ते आता येत्या जुलैत निवृत्त होणार आहेत. त्यांच्यानंतर काय असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे. येत्या जानेवारी महिन्यात सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाईही निवृत्त होणार आहेत. यामुळेच आताच प्रभुदेसाई आणि रिवणकर यांनी आपल्या अधिकाऱयांना स्टेडियम व्यवस्थापनाचे धडे गिरवायल्या शिकवले पाहिजेत. अन्यता आयएसएल फुटबॉल वगळता इतर सर्व खेळांचा कचरा होण्यास वेळ लागणार नाही. पालक अजित गावकर यांच्या एका व्हिडियोने मात्र क्रीडा खाते आणि गोवा क्रीडा प्राधिकरणाने चांगलेच जागे केले आहे. फातोर्डा प्रमाणे स्थिती असलेल्या मैदानावरील प्रशिक्षक आणि प्रशिक्षणार्थी पालक म्हणे आता असल्या मैदानांची लक्तरे काढणारे व्हिडियो आता सागचे कार्यकारी संचालक व्ही. एम. प्रभुदेसाई तसेच क्रीडा सचिव अशोककुमार यांना पाठविणार आहेत. फातोर्डा सराव क्रिकेट खेळपट्टीप्रमाणे राज्यातील अनेक क्रिकेटपटूंना आणि अन्य खेळातील खेळाडूंना याचा फायदा होईल, हा यामागील उद्देश असणार आहे.