प्रतिनिधी / कसबा बीड
करवीर तालुक्यातील चाफोडी गावामध्ये कोरोना संसर्गजन्य रोगाने 1 पॉझिटिव्ह व 1 संशयित मयत झाल्याने चाफोडी गावांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. संशयित मयत वय 40 कोरोना लास्ट स्टेजला असण्याचा अंदाज आहे. सदर व्यक्ती सेंट्रींगचे काम करत असल्याने त्यांचा गावात बऱ्याच ठिकाणी संपर्क होता. त्यांना ताप आल्याने स्थानिक डॉक्टरांना दाखवल्यानंतर अचानक गुदमरल्यासारखे होऊन रक्ताची उलटी झाल्याने ते मयत झाले. हे समजताच कोरोना समिती व ग्रामपंचायत सरपंच सदस्य कर्मचारी व आशा अंगणवाडी सेविका यांनी तात्काळ सदर मयत व्यक्तीच्या ठिकाणी जाऊन योग्य ती दक्षता घेऊन त्यांचा अंत्यविधी केला. त्यानंतर लगेच त्यांच्या संपर्कात आलेले त्यांच्या घरचे 7 लोकांना शिवाजी विद्यापीठ कोवीड सेंटर येथे व आजूबाजूच्या 15 लोकांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
पॉझिटिव्ह आलेली महिला वय 38 या मयत व्यक्तीच्या पत्नी असून मोलमजुरीचे व धूणे- भांडी काम करत होत्या. त्या ठिकाणी काम करत होत्या त्या ठिकाणी व मयत संशयित रुग्ण हे ज्या ज्या ठिकाणी काम करत होते,त्या ठिकाणी सर्वांना सूचना देण्यात आले आहेत. या दोघांच्या संपर्कात जवळपास 100 लोक आल्याचा संशय आहे. यावेळी सरपंच विलास पाटील, माजी उपसभापती पंचायत समिती विजय भोसले, माजी पंचायत सभापती राजेंद्र सूर्यवंशी संजय सुतार सदाशिव जाधव पोलीस पाटील, भगवान पाटील, मारुती सुर्वे, शिरोली दु॥ आरोग्य मैडिकल ऑफिसर मधुरा मोरे,आशा सुपरवायझर संगीता पाटील, सर्व आशा सेविका, ग्रामपंचायत सर्व सदस्य व कर्मचारी आदी उपस्थित होते.