ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
काँग्रेस कार्यकारिणीची आज दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जात आहेत. सोनिया गांधींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीच्या तारखेची घोषणाही झाली आहे. पुढील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूक होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
राहुल गांधी यांनी काँग्रेसचे अध्यक्षपद सोडल्यानंतर सोनिया गांधी ह्या हंगामी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. मात्र पक्षाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी काही नेत्यांकडून होत आहे. त्यानंतर अखेर आज कार्यकारी समितीच्या बैठकीत अध्यक्षपदाच्या निवडणुकीविषयी मोठी घोषणा झाली आहे. त्यानुसार पुढीलवर्षी सप्टेंबर महिन्यात काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे.
पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच
या बैठकीत सोनिया गांधींनी पक्षातील जी-२३ नेत्यांना स्पष्ट आणि सूचक संदेश दिला आहे. पक्षाची पूर्णवेळ अध्यक्षा मीच आहे, असे सोनिया गांधींनी स्पष्ट केले आहे. सोनिया गांधी यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, जर तुम्ही मला असे सांगण्याची परवानगी दिली तर मी सांगते की, मीच काँग्रेसची पूर्णवेळ अध्यक्षा आहे. माझ्यासाठी माध्यमांच्या माध्यमातून बोलण्याची गरज नाही. काही दिवसांपूर्वी कपिल सिब्बल यांनी पक्षामध्ये निर्णय कोण घेत आहे, हे समजत नसल्याचे विधान केले होते.