वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पाकिस्तान आता जम्मू-काश्मीरमधील सीमेनजीक ड्रोनने बॉम्बची घुसखोरी घडवून आणण्याच्या प्रयत्नात आहे. सीमा सुरक्षा दलाने यासंबंधी दक्षतेचा इशारा दिला आहे. जम्मू-काश्मीरच्या आरएसपुरा आणि सांबा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीक सुरक्षेशी संबंधित ठिकाणांवर हल्ला करण्याची योजना आखत असल्याचे समजते.
बीएसएफने अन्य सुरक्षा दलांना पाकिस्तानच्या कटासंबंधी सतर्क केले आहे. पाकने भारतीय भागांना लक्ष्य करत गोळीबार चालविला आहे. तर चीनने पूर्व लडाखच्या सीमेवर सैन्य तैनात केल्याने भारताला दोन आघाडय़ांवर दक्ष रहावे लागत आहे. आयएसआय ड्रोनद्वारे अमली पदार्थ, शस्त्रास्त्रs, दारूगोळा पोहोचविण्याच्या प्रयत्नात असल्याचे बीएसएफकडून सांगण्यात आले आहे. नियंत्रण रेषा ओलांडण्याचे दहशतवाद्यांचे प्रयत्न विफल ठरत असल्याचे बीएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱयाने सांगितले आहे.
5 घुसखोर ठार
पंजाबच्या तरन तारनमध्ये बीएसएफने 5 घुसखोरांना शनिवारी कंठस्नान घातले होते. संशयास्पद हालचाली दिसून आल्यावर बीएसएफने घुसखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी गोळीबार सुरू केला. बीएसएफच्या कारवाईत घुसखोर मारले गेले आहेत.
ड्रोन केला नष्ट
बीएसएफने 20 जून रोजी जम्मू-काश्मीरच्या कथुआ जिल्हय़ात आंतरराष्ट्रीय सीमेवर अत्याधुनिक रायफल आणि ग्रेनेडयुक्त ड्रोन नष्ट केला होता. शस्त्रयुक्त ड्रोन नष्ट करण्याची बीएसएफची ही पहिलीच कारवाई होती. 2019 मध्ये पंजाब पोलिसांनी राज्याच्या सीमावर्ती भागांमध्ये पाकिस्तानी ड्रोन हस्तगत केले होते. बीएसएफनेही पंजाबमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेनजीकच्या अनेक हाय-फ्लाय ड्रोन्स पाहिले होते.