महामुनी शुकदेव राजा परिक्षितीला पुढे म्हणाले-प्रद्युम्नाच्या गदाप्रहाराने विस्मयचकित झालेल्या शंबरासूराने आपले गुरु मयासूर यांचे स्मरण केले आणि तो आकाशात उडून गेला. शंबरासूराने त्याचे गुरु मायासूर याने दिलेल्या आसुरी मायेचा आश्रय घेतला व आकाशातून प्रद्युम्नावर तो अस्त्रांचा वर्षाव करू लागला. रुक्मिणीतनय महारथी । तोही जाला विकळवृत्ति । दैत्य मायेची अद्भुत शक्ति । जाणोनि श्रीपति आठविला ।हृदयीं स्मरतां अधोक्षज। सावध जाला मकरध्वज । तंव मायावतीनें कथिलें गुज। गुप्त येऊनि कर्णपुटीं ।दैत्यमाया हे तामसी । सत्वात्मिका नाशक इयेसी । ते वैष्णवीये महाविद्येसी। स्मरे मानसीं बीजमंत्रें ।मग उठोनि बैसला मदन । हस्तें नेत्र परिमार्जून । सात्विकी महाविद्या जपोन । केली उत्पन्न विष्णुमाया। तयेपासूनि अनेक विद्या। स्मरणमात्रे प्रकटती सद्या । दैत्यमायाकृतकुविद्या। भंगती अविद्या जेंवि बोधें । महारथी प्रद्युम्न त्या अस्त्रांच्या वर्षावाने व्यथित झाला. दैत्य मायेची ही अद्भुत शक्ती पाहिल्यावर त्याला आपला पिता भगवान विष्णूचा अवतार श्रीकृष्ण याचे स्मरण झाले. हृदयामध्ये त्याने भगवंताचे स्मरण केले त्यावेळी मायावतीने गुप्तपणे येऊन त्याच्या कानात सांगितले-हे रुक्मिणीतनया! दैत्यमाया ही तामसी असते. तिचा नाश करण्यासाठी सात्त्विक वैष्णवी माया हवी. तू वैष्णवी महाविद्येच्या बीजमंत्रांचे आता मनोमन स्मरण कर. तेव्हा प्रद्युम्न उठून बसला आणि त्याने संकल्पपूर्वक सात्त्विक महाविद्या जपून विष्णुमाया उत्पन्न केली. तिच्यापासून केवळ स्मरणाने अनेक विद्या प्रकट होतात आणि जी कपटी दैत्याच्या सर्व विद्या नष्ट करते अशी ही विष्णुमाया होती. त्याने सर्व मायांचा नायनाट करणाऱया सत्त्वमय महाविद्येचा प्रयोग केला. त्यानंतर शंबरासुराने यक्ष, गंधर्व, पिशाच, नाग आणि राक्षसांच्या शेकडो मायांचा त्याच्यावर प्रयोग केला, परंतु कृष्णकुमार प्रद्युम्नाने त्या सर्वांचा नाश केला. त्यानंतर त्याने एक तीक्ष्ण तलवार हातात घेऊन वेगाने शंबरासूराचे डोके धडापासून वेगळे केले. त्यावेळी आकाशात दुंदुभी वाजू लागल्या, देवांनी प्रद्युम्नाचा जयजयकार केला. देव फुलांचा वर्षाव करीत त्याची स्तुती करू लागले. मग पूर्वजन्मींची अंगना रति। मायाप्रवीण मायावती। गगनमार्गें जयेसि गति । ते घेऊनि स्वपति निघाली ।तिनें मन्मथा गगनपंथें। नेऊनि द्वारकेमाजि निरुतें। उतरिलें अंतःपुरा आतौतें। तें नृपनाथें परिसावें।महामुनी शुकदेव सांगतात-परिक्षिता ऐक! त्यानंतर प्रद्युम्नाची पूर्वजन्मीची पत्नी जी रति म्हणजेच या जन्मातील मायावती, जी सर्व मायाविद्येत प्रवीण होती तिने प्रद्युम्नाला आकाशमार्गानेच द्वारकेत नेले. तरुणा सुंदरा परिचारिका। असमा ज्यांसि सुरनायिका। उर्वशी तिलोत्तमा मेनका। ज्यांचिया नखा न तुळती। ऐसिया अंतःपुराप्रति । गगनमार्गें उतरोनि क्षिती। प्रवेशलीं दिव्यदंपती। जेंवि जीमूतीं विद्युद्भा । विजेसह असणाऱया मेघाप्रमाणे दिसणाऱया प्रद्युम्नाने आकाशातून शेकडो रमणी निवास करीत असलेल्या द्वारकेतील उत्तम अंतःपुरात मायावती या आपल्या पत्नीसह प्रवेश केला.
Previous Articleटाळेबंदी हा रामबाण की कामचलाऊ उपाय?
Next Article शहापूर परिसरात संपूर्ण लॉकडाऊन
Related Posts
Add A Comment