- राज्यात बाधितांचा आकडा 50 लाखांच्या उंबरठ्यावर
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात काल पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. राज्यातील दैनंदिन आकडे आणि मृत्यूंची वाढती संख्या धडकी भरवणारे ठरले आहेत. दरम्यान, मागील 24 तासात राज्यात कोरोनामुळे 898 जणांनी आपला जीव गमावला आहे. तर आतापर्यंत 74,413 जणांचा मृत्यू झाला आहे. कालच्या दिवशी 54 हजार 022 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर 37 हजार 386 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

गेल्या 24 तासांतील आकडेवारीवर नजर टाकल्यास राज्यातील स्थिती अधिकच भीषण बनत चालल्याचे दिसत आहे. राज्यातील बाधितांची एकूण संख्या 49 लाख 96 हजार 758 वर पोहोचली आहे. त्यातील 42,65,326 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 85.36 % आहे. तर मृत्यूचे प्रमाण 1.49 % इतके आहे. सद्य स्थितीत राज्यात 6 लाख 54 हजार 788 रुग्ण उपचार घेत आहेत.
प्रयोगशाळेत आतापर्यंत तपासणीसाठी पाठविण्यात आलेल्या 2 कोटी 89 लाख 30 हजार 580 नमुन्यांपैकी 17.27 % रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात लोक होम 38 लाख 41 हजार 431 क्वारंटाईनमध्ये असून, 28 हजार 860 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- मुंबई : रुग्णांचा एकूण आकडा 6,71,394 वर

मुंबईतून दिलासादायक बाब समोर आली आहे. कालच्या दिवसात 4,052 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. तर 3,039 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. तर आतापर्यंत 6,06,435 जण कोरोनामुक्त झाले आहेत. शुक्रवारी 71 जणांचा मृत्यू झाला. तर मृतांची एकूण संख्या 13,687 इतकी आहे. सद्य स्थितीत 49 हजार 499 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.