ऑनलाईन टीम / अहमदाबाद :
गुजरातमधील अहमदाबादमध्ये असलेल्या कोविड 19 च्या रुग्णांसाठी तयार करण्यात आलेल्या एका खाजगी रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये गुरुवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली आहे. या घटनेत आठ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद शहरातील नवरंगपुरा परिसरात असलेल्या श्रेय रुग्णालयाच्या आयसीयू वॉर्डमध्ये ही आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.
पुढे ते म्हणाले, या घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला तर 40 जणांना यातून वाचवण्यात आले आहे. सर्व रुग्णांना शेजारीच असलेल्या एका सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, आगीचं कारण आद्याप स्पष्ट झालेले नाही.
या रुग्णालयात कोरोनाच्या 50 रुग्णांवर उपचार सुरू होते. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. या घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत शोक व्यक्त केला आहे.

मोदी आपल्या ट्विट मध्ये म्हणाले की, अहमदाबादमधील रुग्णालयात आग लागल्याची बातमी ऐकून मला दुःख झालेे आहे. या संकटाचा सामना करणाऱ्या कुटुंबांबद्दल मला सहानुभूती आहे. मला आशा आहे की, जखमी झालेले रुग्ण लवकरच बरे होतील. मुख्यमंत्री विजय रुपाणी आणि महापौर बिजल पटेल यांच्याशी या घटनेबाबत चर्चा केली असून प्रशासनाकडून पीडितांना सर्व प्रकारची मदत केली जाईल.