मनीषा सुभेदार /बेळगाव
लख्ख पडला प्रकाश दिवटय़ा-मशालीचा
गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा!
या गीतातून गोंधळ परंपरेचे वर्णन करण्यात आले आहे. परंतु, ही परंपरा नेमकी कशी सुरू झाली? गोंधळी म्हणजे नेमका कोण? किंवा देवीच्या आरतीमधील दिवटी, संबळ, जोगवा हे शब्द कसे काय आले आहेत? या सर्वांची पूर्वपिठीका फारशी माहीत नाही.
नवरात्रीच्या निमित्ताने गोंधळी समाजाला आमंत्रण देऊन ‘तरुण भारत’ने त्यांना बोलते केले आणि खऱया अर्थाने या सर्व शब्दांचा आणि गोंधळ परंपरेचा उलगडा झाला. व्यवहारिक जीवनात गोंधळ हा शब्द गडबड या अर्थाने घेतला जातो. परंतु अध्यात्मिक भाषेत गोंधळ म्हणजे सद्भावनेचा गोंधळ आहे आणि देवदेवतांना आळविण्याचा त्यांना प्रसन्न करण्याचा तो एक प्रघात आहे.
गोंधळाची प्रथा कशी सुरू झाली? देवगणांना त्रास देणाऱया बेटासूराचा रेणुकापुत्र परशुरामाने वध करून त्याचे शिर धडावेगळे केले. हे शिर घेत त्याचा तिंतृण असा आवाज करत तो मातेजवळ आला आणि त्याने आनंदोत्सव केला. त्यातूनच गोंधळाची परंपरा सुरू झाली, अशी आख्यायिका आहे.
याबाबत दुसरी कथा आहे, ती म्हणजे जमदग्नीनी रेणुकेचे शिर उडविण्याची आज्ञा दिली. तेक्हा ते शिर थेट स्वर्गात गेले. रेणुका म्हणजे आदीमाया. त्यामुळे आईचे शिर धारणी होऊन प्रकटले. म्हणून देवगणांनी तिच्या शिराची घटस्थापना केली. आकाशाचा मंटप केला व त्रिगुणात्मकाच्या वाती पेटवून आपल्या मांडीचा संबळ केला आणि ते वाजवून गोंधळ घातला. प्रकृती पुरुषाच्या युगानुयुगे गोंधळ घालण्यासाठी संबळ वाजविणारा गोंधळी तयार झाला आणि गोंधळी समाजाची उत्पत्ती झाली.
संकेश्वरचे ज्ये÷ गोंधळी दत्ता दवडते यांना गोंधळ परंपरेचा पूर्ण इतिहास माहिती आहे. त्यांच्यामते गोंधळी पूजा, अर्चा, उपासना तसेच नाटय़, गायन आणि वादन करुन मनोरंजन करत आला आहे. परंतु शिवरायांच्या काळात या समाजाने हेरगिरी किंवा खबरी म्हणून काम केले आहे.
आणखी एका कथेनुसार देवीने असुरावर विजय मिळाल्याच्या आनंदात गोंधळ घातला गेला. आदीमायेला दागदागिन्यांनी सालंकृत केले गेले. परंतु तिच्या श्रीमुकुटामध्ये गेंदनफुल नव्हते. हे फुल शेषनागाच्या मस्तकी होते. देवीने हे फुल हवे आहे अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हा अर्जुनाने जललोकांत जाऊन बाणाने ते गेंदनफुल मिळविले. हे फुल मिळेपर्यंत 9 दिवस देवीने पाण्याचा थेंबही प्राशन केला नाही. नवव्या दिवशी हे गेंदनफुल देवीने धारण केले. म्हणून नवरात्रीची प्रथा आणि नऊ दिवस उपवास अशी परंपरा सुरू झाल्याचे श्रीशैल माने या गोंधळीनी सांगितले.
गोंधळाला रंग येण्यासाठी संबळाचा वापर केला जातो. आजही संबळ वाजविल्या शिवाय देवीची पालखी निघत नाही. संबळाची परंपरा फार जुनी आहे. दत्ता यांच्या माहितीनुसार शिवाने पार्वतीच्या संतोषासाठी याची निर्मिती केली. ब्रम्हा विष्णू आणि महेशांनी आकाशाचा मंटप करून पूर्णत्वाचा कळस स्थापन केला व पंचमहाभूतांची ताटे उभी केली आणि प्रकृती पुरुषाचा संबळ वाजवून आदी शक्तीची स्तुती केली.
संबळ म्हणजे हरिनामाचा तो संबळ आहे. जीव आणि शिव या दोन अवस्था एकरुप झाल्या की, अद्वैत तत्वज्ञान उभे राहते. तसेच संबळाचे दोन भाग एकाचवेळी वाजले की भक्तीचा नादब्रह्माचे अद्वैतरुप पहावयास मिळते.
दत्ता दवडते

कौटुंबिक आणि सामाजिक स्तरावर उपासनेचा आविष्कार म्हणून गोंधळ परंपरा अखंड सुरू राहिली. शिवरायांचे स्वराज्याचे स्वप्न साकार होताना जगदंबेचे उपासक गोंधळी होऊन शत्रूच्या गोटातील गुप्त माहिती शिवरायांना पोहोचवत. त्यावेळी वीररसाचे पोवाडेही गोंधळींनी तयार केले. त्यातून सैन्यदलात एकजूट होऊन शिवरायांना स्वराज्य स्थापण्यास बळकटी मिळाली. आज समाजात एकजुट राहण्यासाठी गोंधळी समाज प्रयत्नशील आहे.
बसवराज माने

संबळ, तुणतुणे व टाळ यांचा योग्य मेळ साधून गोंधळी गोंधळाला सुरुवात करतो. तो प्रथम चौक मांडतो. प्रथम तो गणरायाला आवतन देतो. देव बोलावतो आणि गोंधळाला सुरुवात करतो. आजही लग्न समारंभ, नवीन घर बांधणे किंवा विकत घेणे अशा शुभसमयी गोंधळ घातला जातो. रंगीत पोशाख, कपाळावर कुंकू, मळवट आणि गळय़ात देवीची प्रतिमा व कवडय़ांची माळ अशा वेशभूषेतील व्यक्ती म्हणजेच गोंधळी होय. गोंधळी आख्यान लावतात. आणि कथा पुढे नेतात. गोंधळ हा लग्न, मुंज, बारसे, जावळ अशा समारंभाच्यावेळी देवदेवतांच्या उपासनेसाठी केलेला एक कुलाचार आहे.
कृष्णा माने

आमचा समाज हा भटका समाज होता. आता तो स्थिरावला असून एकत्र आला आहे. बहुसंख्य समाजामध्ये गोंधळ घालण्याची परंपरा आहे. रात्रीपासून पहाटेपर्यंत गोंधळी गोंधळ घालतात. हा भक्तीचा जागर त्या कुटुंबाला समृद्धीचा वरदहस्त देऊन जातो. आजपर्यंत या समाजाला सरकारने कोणतीही सवलत दिलेली नाही. गोंधळी हा एका अर्थाने पूर्वापार चालत आलेला कलाकार आहे. त्याचा सरकारने विचार करायला हवा.