- देवेंद्र फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात लावण्यात आलेल्या कडक नियमावलीमुळे लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवण्याच्या निर्णयाला नागरिकांचा विरोध आहे. या पार्श्वभूमीवरमहाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले असून, लावण्यात आलेल्या कडक निर्बंधामुळे जनमानसात अस्वस्थता आहे. त्यामुळे तातडीने पावले उचलून त्यांना दिलासा देण्याबद्दल नव्याने अधिसूचना काढण्याची विनंती केली आहे.

ते आपल्या पत्रात म्हणाले, राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढतोय आणि त्यामुळे कठोर निर्बंध लावाले लागतील, असा आपला दूरध्वनी मला आला होता. दोन दिवसांचा लॉकडाऊनचा विषय असल्याने आम्ही सहमती दर्शविली. मात्र, ज्याप्रकारे इतरही पाच दिवस लॉकडाऊनसदृश्य निर्बंध घालण्यात आलेत. त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरुन त्याचा विरोध करत आहेत.
- हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच
हे निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार अजिबात करण्यात आलेला नाही. अनेक क्षेत्रांना या लॉकडाऊनचा मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थेलाही त्यामुळे मोठा फटका बसत आहे. ज्या प्रकारचे निर्बंध प्रत्यक्षात लादण्यात आलेत, ते पाहता हा एकप्रकारे अघोषित महिनाभराचा लॉकडाऊनच आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांचा विचार होणे आवश्यक आहे. अनेक बाबतीत संलग्नता पाहण्यात आलेली नाही. उदाहरणच द्यायचे झाले तर वाहतूक खुली ठेवण्यात गॅरेज आणि स्पेअर पार्ट्स दुकाने मात्र बंद ठेवण्यात आली आहे. असेच प्रकार अनेक बाबतीत झाले आहेत.
त्यामुळे माझी विनंती आहे की, पुन्हा एकदा सर्व छोट्या-छोट्या घटकांशी चर्चा करुन त्यांना दिलासा देण्यात यावा. सर्वांना विश्वासात घेऊन, गरीबांचे जीवन आणि अर्थकारण दोन्हीही प्रभावित होणार नाही, अशा पद्धतीनं नव्याने निर्बंधाबाबतची अधिसूचना जारी करण्यात यावी.
कोरोनाला रोखणे महत्वाचे आहेच. पण, कोरोना रोखताना अन्य मानवनिर्मित कारणांमुळे नागरिकांच्या जगण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण होईल, अशीही कृती होता कामा नये. आपण तत्काळ या संदर्भात पाऊले उचलाल, असा विश्वास वाटतो, असेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.