मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांची घोषणा
प्रतिनिधी/ रत्नागिरी
ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांना (जि. प. सेस योजना) योजनेंतर्गत ‘आदर्श शाळा पुरस्कार’ देण्यात येणार आहेत. त्या अंतिम निवड झालेल्या शाळांची नावे मंगळवारी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केली.
प्राथमिक शाळांना (जि. प. सेस योजना) योजनेंतर्गत ‘आदर्श शाळा पुरस्कार’साठी जिल्हा पातळीवरील निवड समितीची सभा नुकतीच जिल्हा परिषद प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यामध्ये आदर्श शाळांसाठी शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या सभेला प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे, उपशिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते, शिक्षण विस्तार अधिकारी संदेश कडव, स. रा. देसाई अध्यापक विद्यालय रत्नागिरीचे प्राचार्य नेताजी कुंभार, संतोष जाधव, राज्य राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त शिक्षक इ. उपस्थित होते.
आदर्श शाळांची निवड दाखल पात्र मुले दाखल होण्याची टक्केवारी, उपस्थितांचे शेकडा प्रमाण, शाळा सिध्दी श्रेणी, सा.फु.द.पा. योजना, शैक्षणिक मार्गदर्शन, शासनाच्या विविध योजना, शैक्षणिक उठाव, गावाच्या मदतीने एखादा उपक्रम शिक्षक राबवत असतील तर त्याची माहिती, शाळेतील उपक्रम, प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची अंमलबजावणी इत्यादी निकषांवर करण्यात आली. लवकरच या शाळांचा गौरव समारंभ जाहीर करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकिरण पूजार यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेला प्राथमिक शिक्षणाधिकारी वामन जगदाळे हे देखील उपस्थित होते.
चौकट…….
निवड करण्यात आलेल्या आदर्श शाळा पुरस्कार सन 2022-23:
►कनिष्ठ प्राथमिक शाळा: जि. प. प्राथमिक शाळा तिडे बौध्दवाडी (मंडणगड), जि.प. प्राथमिक शाळा मुर्डी नं.1 (दापोली), जि. प. प्राथमिक शाळा चिंचघर मेटकर डाऊल (खेड), जि.प. प्राथमिक शाळा पोसरे नं.2 (चिपळूण), जि.प. प्राथमिक शाळा जानवळे नं.3 (गुहागर), जि.प. प्राथमिक शाळा कोळंबे नं.1 (संगमेश्वर), जि. प. प्राथमिक शाळा वाटद कवठेवाडी (रत्नागिरी), जि.प. प्राथमिक शाळा बेनी बु. गुरववाडी नं.4 (लांजा), जि.प. प्राथमिक शाळा बेणगी (राजापूर).
►वरिष्ठ प्राथमिक शाळा: जि.प. प्राथमिक शाळा ढांगर (मंडणगड), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोळबांद्रे नं.1 (दापोली), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा नांदिवली दंड (खेड), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा पोसरे नं.1 (चिपळूण), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा (गुहागर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा कोंड्यो नं. 2 (संगमेश्वर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा डिंगणी खाडेवाडी (संगमेश्वर), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा गोळप नं.1 (रत्नागिरी), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा वाकेड नं. 1 (लांजा), जि.प. पूर्ण प्राथमिक शाळा चिखलगाव (राजापूर).
►केंद्रप्रमुख पुरस्कार-संतोष तारवे (केंद्राचे नाव-केंद्र तुळसणी व कोंड्यो नं. 1, संगमेश्वर)