30 जून पर्यंत मतदारसंघात लसीकरण
वार्ताहर / रेवोडा
राज्यात सुरू असलेल्या टिका उत्सवास चांगला प्रतिसाद मिळत असून सरकारचे 30 जून पर्यंतचे पहिल्या डोसचे शंभर टक्के लसीकरणाचे उद्दीष्ट यशस्वीपणे पार पडेल, अशी आशा प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी व्यक्त केली. पीर्ण येथील शांतादुर्गा विद्यालयात सुरू केलेल्या 18 वर्षांवरील टीका उत्सवाच्या कार्यक्रमास ते उपस्थित होते. यावेळी थिवीचे आमदार नीळकंठ हणर्ळकर, भाजप प्रदेश महामंत्री सतीश थोंड, थिवी भाजप मंडळ अध्यक्ष विश्वनाथ खलप, पिर्ण पंचायत सरपंच रुचा नाईक, कोलवाळ आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉ. योगेश गोवेकर आदी उपस्थित होते.
अठरा वर्षांवरील लोकांसाठी रविवारपासून 164 केंद्रातून लसीकरण सुरू करण्यात आले. आतापर्यंत 45 वर्षांवरील 80 टक्के लोकांनी पहिला डोस घेतल्याने तानावडे यांनी यावेळी सांगितले. थिवीचे आमदार नीळकंठ हणर्ळकर यांनी थिवी मतदारसंघातील आठ गावात कोलवाळ प्राथमिक आरोग्य केंद्रातर्फे लसीकरण करण्यात येणार असल्याचे सांगितले. पिर्ण येथे 13 व 14 जून असे दोन दिवस पूर्ण झाल्यानंतर 15 व 16 सरकारी शाळा नादोडा, 17, 18 व 19 ग्रामपंचायत इमारत अस्नोडा, 20 जून सरकारी प्रा. शाळा माजीलवाडा रेवोडा, 21, 22, 23 रोजी पीपल्स हायस्कूल कामुर्ली येथे, 24 व 25 रोजी सरकारी प्रा. शाळा शिरसई येथे 26, 27, 28 रोजी लिवरामेंट हॉल पंचायतीजवळ थिवी येथे व 29, 30 रोजी रिक्रियेशन हॉल कान्सा थिवी येथे लसीकरण करण्यात येईल.
लोकांनी आपापल्या केंद्रावर येऊन किंवा कोलवाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात येऊन स्वतःहून लसीकरण करून घ्यावे व सध्या सुरू असलेल्या कोविड महामारीवर मात करावी, असे आवाहन आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी केले. पिर्ण येथे दोन दिवस सुरू असलेल्या लसीकरणास 18 वर्षांवरील व 45 वर्षांवरील लोकांनी मोठय़ा प्रमाणात उपस्थिती लावून लस टोचून घेतली.