केवळ एकच विद्यार्थी अनुत्तीर्ण – निकालात चिकोडी 23 व्या तर बेळगाव शैक्षणिक जिल्हा 24 व्या स्थानी
प्रतिनिधी/ बेंगळूर
उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या राज्यातील दहावी परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. 99.9 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. केवळ एकच विद्यार्थी अनुत्तीर्ण झाला आहे. जिल्हानिहाय निकालात बेळगाव शैक्षणिक जिल्हा 24 व्या स्थानावर तर चिकोडी शैक्षणिक जिल्हा 23 व्या स्थानावर आहे. बेंगळूर उत्तर शैक्षणिक जिल्हय़ाने अग्रस्थान पटकावले आहे तर बळ्ळारी जिल्हा शेवटच्या स्थानावर राहिला आहे. कोरोना परिस्थितीमुळे तीव्र विरोध असताना देखील 19 आणि 22 जुलै रोजी राज्यभरात परीक्षा घेण्यात आली होती.
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत दहावी परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. राज्यात प्रथमच परीक्षा पद्धतीत बदल करून बहुपर्यायी प्रश्नोत्तराच्या स्वरुपात परीक्षा घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुण आणि त्याच्या आधारे ग्रेडींग देण्यात आले आहेत. बहुतेक सर्व विद्यार्थी स्वपरिश्रमानेच उत्तीर्ण झाले आहेत. तर 9 टक्के विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे.
कोरोना परिस्थितीमुळे राज्यात बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे दहावीच्या परीक्षाही रद्द होतील, अशी अनेकांची समजूत झाली होती. मात्र, विद्यार्थ्यांचे भवितव्य आणि पुढील शैक्षणिक प्रवेशात अडचणी उद्भवू नयेत यासाठी कोणत्याही परिस्थितीत परीक्षा घेण्याच्या निर्णयावर तत्कालिन शिक्षणमंत्री एस. सुरेशकुमार ठाम होते. 2019-20 या शैक्षणिक वर्षात दहावी परीक्षेसाठी केलेल्या ठोस उपाययोजनांप्रमाणेच यंदा देखील अत्यंत सुरक्षा व्यवस्थेत परीक्षा घेण्यात आली होती. प्रश्नपत्रिकेचे स्वरुपही बदलण्यात आले होते. जुलै 19 आणि 22 रोजी परीक्षा घेण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय भाषा विषयांचा 120 गुणांचा एक पेपर आणि गणित, विज्ञान, समाज विषयांचा 120 गुणांचा दुसरा पेपर अशी एकूण 240 गुणांची परीक्षा घेण्यात आली होती. प्रत्येक विषयांना 40 पैकी मिळालेल्या गुणांचे 100 टक्के गुणांमध्ये रुपांतर करून निकाल जाहीर करण्यात आला आहे. जिल्हय़ांचा निकाल यंदा टक्केवारीत न देता श्रेणी स्वरुपात जाहीर करण्यात आला आहे. सर्व 34 शैक्षणिक जिल्हय़ांना अ श्रेणी मिळाली आहे.
दहावी परीक्षेला एकूण 8,76,581 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 4,72,643 विद्यार्थी आणि 4,01,282 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या आहेत. 90 टक्क्यांपेक्षा अधिक म्हणजेच अ+ श्रेणीत 1,28,931 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर 2,50,317 विद्यार्थी अ श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. 2,87,684 विद्यार्थी ब श्रेणीत आणि 1,13,610 विद्यार्थी क श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. क श्रेणीत उत्तीर्ण झालेल्यापैकी 9 टक्के विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे. 13 विद्यार्थ्यांना कमाल 28 ग्रेस मार्क देऊन उत्तीर्ण करण्यात आले आहे. यंदा 156 विद्यार्थ्यांना शंभर टक्के म्हणजेचे 625 पैकी 625 गुण मिळाले आहेत. तर प्रथम भाषा विषयात 25,702 विद्यार्थ्यांना 125 पैकी 125 गुण मिळाले आहेत.
कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही
यंदा दहावी परीक्षा दिलेले 8.76 लाख विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज्यातील सर्व सरकारी, अनुदानित आणि खासगी पदवीपूर्व महाविद्यालये, आयटीआय महाविद्यालयांमध्ये 12 लाख विद्यार्थ्यांना प्रवेश देता येणार आहे. त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला महाविद्यालयीन प्रवेशापासून वंचित रहावे लागणार नाही. पदवीपूर्व महाविद्यालये सुरू करण्यासाठी अनेश शिक्षण संस्थांनी परवाना मिळविण्यासाठी अर्ज केले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी प्रवेशाबाबत गोंधळून जाण्याची आवश्यकता नाही, असे स्पष्टीकरण शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी दिले आहे.
वेबसाईट् ‘पॅश’
प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणमंत्री बी. सी. नागेश यांनी सोमवारी दुपारी 3ः30 वाजता दहावीचा निकाल जाहीर केल्यानंतर शिक्षण खात्याने उपलब्ध करून दिलेल्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थी एकाच वेळी तुटून पडले. त्यामुळे अन् तांत्रिक समस्या निर्माण झाली. परिणामी अनेक जणांमध्ये गोंधळ उडाला. अखेर शिक्षण खात्याने पर्यायी वेबसाईट्स उपलब्ध करून दिल्या. सुमारे तीन तासांनंतर सर्व वेबसाईट सुरळीतपणे कार्यरत झाल्या.
बोगस विद्यार्थी पाठविणारा नापास
दहावी परीक्षेत एका विद्यार्थ्याने आपल्याऐवजी दुसऱयाला पाठवून दिले होते. तपासणीवेळी बोगस विद्यार्थी सापडला. त्यामुळे आपल्याऐवजी दुसऱयाला परीक्षेसाठी पाठवून देणाऱया विद्यार्थ्याला नापास करण्यात आले आहे, अशी माहितीही शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे.
