लाकूड परवान्यासाठी लाच घेताना पकडले होते रंगेहाथ
वार्ताहर / मौजेदापोली
लाकूड वाहतूक परवाना देण्यासाठी 6 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलेल्या वनपाल गणेश खेडेकर यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दापोली वनविभागाचे वनाधिकारी वैभव बोराटे यांनी ही माहिती दिली.
रत्नागिरी लाचलुचपत विभागाच्या पथकाने केलेल्या कारवाईत वनपाल गणेश खेडेकर व खासगी व्यक्ती सचिन आंबेडे यांना रंगेहाथ पकडण्यात आले होते. या दोघांनाही न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र वनपाल खेडेकर याची प्रकृती बिघडल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
लाच मागितल्याप्रकरणी कारवाई होताच कोल्हापूर येथील मुख्य प्रादेशिक वनसंरक्षक कार्यालयाकडून खेडेकर याच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा-शिस्त व अपिल नियम 1979 नियम 8 अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली. त्या नियमांच्या तरतुदीनुसार शासन सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.
दोघांनाही जामीन
वनपाल खेडेकर व सचिन आंबेडे यांची खेड न्यायालयाने जामिनावर मुक्तता केली असल्याचे रत्नागिरी येथील लाचलुचपत विभाग व दापोली वनविभागाकडून चौकशीदरम्यान सांगण्यात आले. न्यायालयात वनपाल खेडेकर याच्यावतीने ऍड. सोहम भोजने व ऍड. ऋषिकेश थरवड, तर आंबेडे याच्यावतीने ऍड. अश्विन भोसले व ऍड. प्रियांका भोसले यांनी काम पाहिले.
तौफीक मुल्ला यांच्याकडे वनपालपदाची जबाबदारी
दापोलीचे वनपाल गणेश खेडेकर यास लाचलुचपत विभागाच्या कारवाईमुळे निलंबित करण्यात आले आहे. त्यामुळे वनपालपदाचा अतिरिक्त कार्यभार दापोली येथील सामाजिक वनीकरण विभागाचे तौफिक मुल्ला यांच्याकडे देण्यात आला आहे.