प्रतिनिधी/ कराड
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, खासदार शरद पवार 12 डिसेंबर रोजी होणाऱया वाढदिवसानिमित्ताने येथील सौ. वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन व सभासद नोंदणी अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा जिह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.
या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी येथे आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. नामदार बाळासाहेब पाटील म्हणाले की, रविवार 12 डिसेंबर रोजी खासदार शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबई येथे होणाऱया वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण / व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन वेणूताई चव्हाण सांस्कृतिक सभागृहात सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत करण्यात येणार आहे. शरद पवारांनी महाराष्ट्राच्या विकासात दिलेले योगदान, लोकहिताचे घेतलेले महत्वाचे निर्णय याची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचणे आवश्यक आहे, त्यासाठी राष्ट्रवादी परिवारसंवाद अभियान राबविण्यात येणार आहे. 17 डिसेंबरपासून होणाऱया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानास उस्फूर्तपणे सहभाग नोंदवावा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे सर्व नियम पाळून, गांवोगावी विविध सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा करण्यात यावा.
जिल्हा परिषदेचे शिक्षण व अर्थ समिती सभापती मानसिंगराव जगदाळे, कराड उत्तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष देवराज पाटील, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी सदस्य जितेंद्र पवार, ऍड. राजाभाऊ पाटील, पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, जिल्हा परिषद सदस्या सुरेखा जाधव, विनिता पलंगे, संगीता साळुंखे, माजी उपनगराध्यक्ष सुभाषराव पाटील, सागर पाटील, सह्याद्रिचे संचालक जशराज पाटील, विरोधी पक्षनेते सौरभ पाटील, पंचायत समिती सदस्य रमेश चव्हाण, माजी सभापती शालन माळी, माजी पंचायत समिती सदस्य भाऊसाहेब चव्हाण, बाळासाहेब सूर्यवंशी, नंदकुमार बटाणे, पोपटराव साळुंखे, सुहास पवार, संभाजी सुर्वे, विलास कुंभार, अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, शंकरराव खापे, ऍड. मानसिंगराव पाटील, ऍड. प्रताप पाटील, ऍड. प्रमोद पुजारी, जयंत बेडेकर, प्रशांत यादव उपस्थित होते.
मानसिंगराव जगदाळे व देवराजदादा पाटील यांनी मनोगत व्यक्त केले, पोपटराव साळुंखे यांनी आभार मानले.