आयडीएफने गाझापट्टीवर डागली क्षेपणास्त्र
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील शस्त्रसंधी 26 दिवसांनी तुटली आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सने (आयडीएफ) बुधवारी पॅलेस्टाईनच्या गाझापट्टीच्या खान युनिस या भागात एअरस्ट्राइक केला आहे. गाझाकडून दक्षिण इस्रायलच्या दिशेने स्फोटकेयुक्त फुगे सोडले जात होते. याच्या प्रत्युत्तरादाखल कारवाई करण्यात आल्याचे आयडीएफकडून सांगण्यात आले आहे.
इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात 11 दिवसांपर्यंत चाललेल्या संघर्षानंतर 21 मे रोजी इजिप्तच्या मध्यस्थीने शस्त्रसंधी झाली होती. नव्या एअरस्ट्राइकद्वारे इस्रायलचे नवे पंतप्रधान नेफ्टाली बेनेट यांनी पॅलेस्टाईनबद्दल स्वतःचे धोरण अत्यंत कठोर राहणार असल्याचा संदेश दिला आहे.

हमासच्या तळांवर हल्ला केला आहे. कुठल्याही प्रकारच्या हल्ल्यासाठी आम्ही तयार आहोत असे आयडीएफने एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले आहे. यापूर्वी मे महिन्यात 11 दिवसांपर्यंत चाललेल्या युद्धात पॅलेस्टाइनच्या 253 जणांना जीव गमवावा लागला होता. यात 66 मुलांचाही समावेश होता. हमासच्या हल्ल्यात इस्रायलमधील 13 जणांचा मृत्यू झाला होता.
फ्लॅग मार्चमुळे तणाव
तत्पूर्वी मंगळवारी इस्रायलमधील जहालमतवाद्यांनी फ्लॅग मार्च काढला होता, यातून तेथे तणावाची स्थिती निर्माण झाली होती. जेरूसलेम मार्च काढण्यात आला तर अल-अक्सा मशिदीच्या रक्षणार्थ रॉकेट डागणार असल्याची धमकी हमासकडून देण्यात आली होती.
जेरूसलेम मार्च
अरब देशांसोबत 1967 मध्ये 6 दिवस चाललेल्या युद्धात इस्रायलचा विजय झाला होता. त्यानंतर पूर्व जेरूसलेमवर इस्रायलने कब्जा मिळविला होता. या विजयाच्या स्मृतिप्रित्यर्थ कट्टर ज्यू दरवर्षी हा मार्च (फेरी) आयोजित करतात. जेरूसलेम मार्च पारंपरिकदृष्टय़ा जेरूसलेम दिन म्हणजेच ज्यू दिनदर्शिकेनुसार 28 इयारला (ज्यू महिना) साजरा करण्यात येतो.