सरत्या वर्षाला सूर्यास्ताच्या साक्षीने निरोप ः किनारी भागात लोटला जनसागर
प्रतिनिधी/ पेडणे
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या जल्लोषात स्वागत करण्यासाठी पेडणे तालुक्मयातील सर्व समुद्र किनारे आणि हॉटेल्स नाईट क्लब हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र होते. अक्षरशः किनाऱयावर जनसागर लोटला होता.
पार्किंगचे तीन तेरा वाजल्यामुळे सर्वत्र वाहतूक कोंडी, कासव गतीने चालणारी वाहने, यामुळे निश्चित वेळेत नागरिकांना अपेक्षित ठिकाणी पोहोचण्यात अडचणी आल्या. वेगळी पार्किंग व्यवस्था नसल्याने रस्त्याच्या कडेला लोकांनी वाहने पार्क केली, त्यामुळे वाहतूक कोंडी होत होती. वाहतून पोलीस यंत्रणा वाहतूक कोंडी सोडविण्याचे आटोकाट प्रयत्न करताना दिसत होते.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी किनारी भागात सकाळपासूनच पर्यटकांनी गर्दी केली होती. या देशी पर्यटकांचा मोठा सहभाग होता. स्वतःची वाहने, टेम्पो ट्रव्हल घेऊन हे पर्यटक किनारी भागात दाखल झाले होते. पार्किंग व्यवस्था फुल्ल झाल्यामुळे मिळेल त्या ठिकाणी वाहने पार्क करावी लागली. प्रत्येक ठिकाणी वाहतूक पोलीस पोहोचू शकले नाहीत, त्यामुळे ठीकठिकाणी वाहतूक कोंडीचा सामना पर्यटकांना करावा लागला.
पेडणे तालुक्मयातील किनारी भागात सायंकाळी फेरफटका मारला असता, गत वर्षीच्या तुलनेत यंदा पर्यटकांच्या संख्येत 75 टक्क्यांनी वाढ झाली. यामध्ये विदेशी पर्यटकांची संख्या मात्र कमी आहे, असे काही व्यावसायिकांनी सांगितले.
संगीत रजनीत बाऊन्सर तैनात
नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर किनारी भागात प्रवेश शुल्क आकारून ज्या संगीत रजनी आयोजित केल्या होत्या. त्या ठिकणी आयोजकांनी बोन्सर तैनात करण्यात आले आहे, हे बाऊन्सर पार्किंग स्थळी, पार्टीच्या प्रमुख गेट जवळ तैनात करण्यात आले होते.
वाहतूक नियंत्रणासाठी वाहतूक पोलीस तैनात
पेडणे वाहतूक विभागाकडे आवश्यक ते पुरेसे कर्मचारी वर्ग असूनही त्यातील अर्धे वाहतूक पोलीस कळंगूट भागातील वाहतूक व्यवस्थेसाठी पाठवण्यात आले होते. तर पोलीस आगरवाडा चोपडे जंक्शन, मोरजी चर्च जंक्शन, मोरजी गावडेवाडा जंक्शन, आश्वे चर्च, मधला माज, मांदे व हरमल या ठिकाणा तैनात केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
चोख पोलीस बंदोबस्त!
पेडणे पोलीस निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्याकडे संपर्क साधला असता, कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला असून अनेक भागात पोलीस तैनात केले असून किनारी भागात पोलीस वेळोवेळी गस्त घालणार आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
सूर्यास्त टिपण्यासाठी गर्दी
सरत्या वर्षांचा सूर्यास्त कॅमेरात टिपण्यासाठी हजारो पर्यटकांनी किनारपट्टी भागात हजेरी लावली होती. सूर्य समुद्रात डुंबतानाचा क्षण कॅमेरात टीपण्यासाठी उपस्थित पर्यटकांत जणू एक प्रकारे स्पर्धाच लागली होती.