महागाईच्या विळख्यामुळे तणावाखालीच पुन्हा पेरणी
प्रतिनिधी/ बेळगाव
नुकत्याच झालेल्या मान्सूनच्या दमदार पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले. बळ्ळारी नाल्याला जून महिन्यातच पूर आला. बळ्ळारी नाला परिसरातील शिवारामध्ये पाणी साचून राहिल्यामुळे पेरणी केलेल्या भात पीकाचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱयांना दुबार पेरणी करण्याची वेळ आली. यामुळे मोठा आर्थिक फटका बसला आहे. केवळ बळ्ळारी नालाच नाही तर अनेक गावातील सखल शिवारामध्ये पाणी साचून भात पिकाचे नुकसान झाले आहे. आता पावसाने उघडीप दिल्याने दुबार पेरणीला शेतकऱयांनी सुरूवात काली आहे. मात्र हे ही पीक निसर्गावरच अवलंबून असल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱयांतून व्यक्त होत आहेत.

यावषी शेतकऱयांनी धूळवाफ पेरणी केली होती. त्यानंतर भाताची उगवण होत असतानाच मान्सूनचे दमदार आगमन झाले आणि सर्वत्र पाणीच पाणी झाले. सलग आठवडाभर पाऊस झाल्याने पाण्याचा निचरा झाला नाही. शिवारामध्ये पाणी साचून राहिल्याने भात पीक पाण्याखाली गेले. नुकतीच उगवण झालेले हे भातपीक पाण्यामुळे कुजून गेले. वडगाव, शहापूर, अनगोळ, मजगाव, जुने बेळगाव, अलारवाड, मुतगा, कुडची या परिसरातील शेतकऱयांना शाप ठरलेल्या बळ्ळारी नाल्यामुळे परिसरातील शेकडो एकर जमिन पाण्याखाली जाऊन पीक कुजून गेले आहे.
शेतकऱयांनी महागाने भात, खते घेऊन पेरली होती. या पेरणीसाठी टॅक्टर तसेच बैलजोडी याचा वापर करण्यात आला होता. त्याचं भाडेही द्यावे लागले होते. मोठा खर्च करून भातपिक वाया गाले असून आता दुबार पेरणी करावी लागत आहें. त्यामुळे पुन्हा मोठा आर्थिक भुर्दंड बसू लागला आहे. यामुळे बळीराजा मोठय़ा आर्थिक संकटात सापडला असून पेरणी करताना देखील तणावाखाली असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
बळ्ळारी नाल्याबरोबरच येळ्ळूर, मजगाव, धामणे, झाडशहापूर,मच्छे, पिरनवाडी, हलगा बस्तवाड या परिसरातील शेतकऱयांची पीके कुजून वाया गेली आहेत. त्यामुळे त्या परिसरातील शेतकरीही दुबार पेरणी करत आहेत. या शेतकऱयांना आता या पेरणीसाठी कर्ज घ्यावे लागले आहे. आता पेरणी केली तरी भविष्यात येणाऱया पावसावर तसेच निसर्गावरच आमचे भविष्य अवलंबून असल्याचे शेतकऱयांनी सांगितले.