परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांची बसस्थानकाला भेट : कंत्राटदाराला तातडीने काम करण्याचे दिले आदेश
प्रतिनिधी / बेळगाव

सीबीटी बसस्थानकाचा स्मार्ट सिटी अंतर्गत विकास साधण्यात येत आहे. सध्या या बसस्थानकाच्या तळमजल्याचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. लॉकडाऊनमुळे मध्यंतरी बऱयाच काळासाठी हे काम रखडले होते. उपमुख्यमंत्री तथा परिवहन मंत्री लक्ष्मण सवदी यांनी बसस्थानकाला भेट देऊन कंत्राटदाराला तातडीने काम करण्याचे आदेश दिले आहेत. सध्या बसस्थानकाचे काम प्रगतीपथावर असून तळमजल्याच्या स्लॅब भरणीचे काम लवकरच हाती घेण्यात येणार आहे. प्रवाशांची वाढती गर्दी आणि अपुरी जागा लक्षात घेवून सुसज्ज स्मार्ट बसस्थानक उभारण्यात येत आहे. तब्बल 31 कोटी रुपयांच्या निधीतून हा विकास साधण्यात येत आहे. शिवाय मध्यवर्ती बसस्थानक आणि सीबीटी बसस्टॅन्ड जोडण्यासाठी भुयारी मार्गाची व्यवस्था करण्यात आली आहे. हे काम देखील पूर्णत्वाकडे आले आहे. त्यामुळे दोन्ही बसस्थानकात ये-जा करण्यासाठी हा भुयारी मार्ग सोयिस्कर होणार आहे. बसस्थानकात लांब पल्ल्यासह स्थानिक प्रवाशांची संख्या अधिक असते. त्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होते. याकरिता सीबीटी बसस्थानकाच्या तळमजल्यात पार्किंगची सोय करण्यात येत आहे. याठिकाणी दुचाकीसह चारचाकी वाहनांच्या पार्किंगसाठी व्यवस्था केली जात आहे. त्यामुळे आता बसस्थानकातील पार्किंगची समस्या दूर होणार आहे. या पार्किंगसाठी उभारलेल्या स्लॅबचे काम देखील शेवटच्या टप्प्यात आहे. काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी स्मार्ट बसस्थानकाच्या कामामुळे प्रवाशांसाठी तात्पुरत्या बसस्थानकाची उभारणी करण्यात आली आहे. या बसस्थानकातून सध्या प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र प्रवाशांना याठिकाणी सोयांपेक्षा असुविधांचाच सामना करावा लागत आहे. त्यामुळे स्मार्ट बसस्थानकाचे काम तातडीने पूर्ण करून प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करावे, अशी मागणी प्रवाशांतून होत आहे.