प्रतिनिधी/ सातारा
स्वच्छ भारत अभियानाअंर्गत घन कचरा प्रकल्पामध्ये सोनगाव कचरा डेपोत बायोमायनिंगच्या चुकीच्या व बेकायदेशीर निविदा काढल्याचा आरोप करत कोणतीही कार्यवाही केल्याच्या निषेधार्थ दि.2रोजी उपोषण करण्याचा इशारा सूर्यकांत गोरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, सातारा पालिका बायोमायनिंग संदर्भात चुकीच्या व बेकायदेशीरपणे शासनाची दिशाभूल करून प्रक्रिया राबवली. साडे तीन कोटींचा बोजा सातारा शहरातील नागरिकांवर पडणार आहे.या कामाची निविदा प्रसिद्ध केल्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पुणे यांची मान्यता येण्या अगोदर निविदा काढणे, जीवन प्राधिकरण पुणे यांची नियमावली पाळली गेली नाही.महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची मान्यता न घेणे, सर्वसाधारण सभेची मान्यता न घेणे, त्या अगोदर स्थायी समितीत दर मंजूर करणे, अशा त्रुटी आहेत.तरीही चुकीच्या पध्दतीने प्रक्रिया राबवल्याने शासनाचे अनुदान नसताना दिशाभूल करून राबवल्याबद्दल म.न.प.न.प. व औ.न. अधिनियम 1965 चे कलम 308 अनव्ये प्रक्रिया स्थगिती करून रद्द करावी,सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.