वृत्तसंस्था/ लिव्हरकुसेन
बुंदेस लीग फुटबॉल स्पर्धेत रविवारी झालेल्या सामन्यात बोऊसिया डॉर्टमंडने यजमान बायर लिव्हरकुसेनचा 2-0 अशा गोलफरकाने पराभव केला. या स्पर्धेला पुन्हा प्रारंभ झाल्यानंतर बोऊसियाचा हा तिसरा विजय आहे. या विजयामुळे बोऊसियाने स्पर्धेच्या गुणतक्त्यात वरच्या स्थानावर झेप घेतली आहे. आघाडीचे स्थान मिळविण्यासाठी त्यांना आता केवळ तीन गुणांची गरज आहे.
हिवाळी मोसमामुळे ही स्पर्धा मध्यंतरी थांबविण्यात आली होती. पुन्हा या स्पर्धेला प्रारंभ झाल्यानंतर बोऊसियाने आपले तिन्ही लीग सामने जिंकले आहेत. या स्पर्धेत लिव्हरकुसेनने यापूर्वी सलग पाच सामने जिंकले होते. आता त्यांची घौडदौड बोऊसियाने थोपविली आहेत. रविवारच्या सामन्यात 33 व्या मिनिटाला करिम अॅडेमीने बोऊसियाचे खाते उघडले. 53 व्या मिनिटाला लिव्हरकुसेनच्या एडमंड टेसोबाने नजरचुकीने आपल्याच संघाच्या गोलपोस्टमध्ये चेंडू मारत बोऊसियाला बोनस गोल बहाल केला. बोऊसियाने या स्पर्धेच्या गुणतक्त्यात 34 गुणांसह चौथे स्थान मिळविले आहे. बायर्न म्युनिच पहिल्या स्थानावर असून लिव्हरकुसेन 24 गुणांसह नवव्या स्थानावर आहे.