विश्व युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिप ः सात महिलांचा समावेश, तीन बॉक्सर्सना कांस्यपदके
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सात महिलांसह भारताच्या एकूण आठ बॉक्सर्सनी पोलंडमधील कील्से येथे सुरू असलेल्या विश्व युवा चॅम्पियनशिपमध्ये अंतिम फेरी गाठत अभूतपूर्व कामगिरी नोंदवली आहे.
या आठ जणांव्यतिरिक्त तीन बॉक्सर्सना कांस्यपदक मिळाले असल्याने आजवरची ही सर्वोत्तम कामगिरी ठरणार आहे. यापूर्वी 2018 मध्ये सर्वाधिक 10 पदके मिळवित भारताने सर्वोत्तम कामगिरी नोंदवली होती. पोलंडमधील स्पर्धेत अंतिम फेरी गाठलेल्या खेळाडूंत गितिका (48 किलो), बेबीरोजिसाना चानू (51 किलो), विनका (60 किलो), अरुंधती चौधरी (69 किलो), पूनम (57 किलो), थॉकचोम सनामाचा चानू (75 किलो), अल्फिया पठाण (81 किलोवरील) या महिलांचा समावेश आहे. पुरुषांमध्ये फक्त सचिनने (56 किलो गट) अंतिम फेरी गाठण्यात यश मिळविले तर अन्य तिघांनी कांस्यपदके मिळविली.
गितिकाने इटलीच्या एरिका प्रिसियानदरोचा 5-0 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. तिची जेतेपदाची लढत पोलंडच्या नतालिया डॉमिनिकाशी होणार आहे. विनकाने झेक प्रजासत्ताकच्या व्हेरोनिका गॅडोव्हावर 4-1 अशी मात केली. तिची अंतिम लढत कझाकच्या झुल्डीझ शायाखमेटोव्हाशी होणार आहे. अंतिम लढती गुरुवारी होणार आहेत. अरुंधतीला उझ्बेकच्या खदिचबोनू अब्दुलाएव्हाला 5-0 असे एकतर्फी हरविताना फारसे सायास पडले नाहीत. पोलंडच्या बार्बरा मर्सिनकोवस्काशी तिची सुवर्णपदकाची लढत होईल. बेबीरोजिसानानेही याच फरकाने इटलीच्या इलेन आयारीचा पराभव केला. तिची लढत रशियाच्या व्हॅलेरिया लिन्कोव्हाशी होणार आहे. बेबीरोजिसाना ही विद्यमान युवा आशियाई चॅम्पियन आहे. पूनमने उझ्बेकच्या सितोरा तुर्दिबेकोव्हाचा 5-0 असा पराभव केला. फ्रान्सच्या स्थेलीन ग्रोसीविरुद्ध तिची सुवर्णपदकाची लढत होणार आहे. सनामाचा चानूने पोलंडच्या दारिया परादावर 4-1 अशी मात केली. कझाकची डॅना डिडेविरुद्ध तिची जेतेपदासाठी लढत होईल. अल्फियाला मात्र पोलंडच्या ओलिविया टोबोरेकविरुद्ध 3-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळविता आला. मॉल्डोव्हाची दारिया कोझोरेक ही तिची अंतिम लढतीतील प्रतिस्पर्धी असेल.
संध्याकाळच्या सत्रात सचिन हा एकमेव विजयी खेळाडू ठरला. त्याने इटलीच्या मिचेली बल्दासीचा पराभव केला. कझाकचा येरबोलात साबीर हा त्याचा अंतिम प्रतिस्पर्धी असेल. आशियाई युवा स्पर्धेतील रौप्यजेती अंकिता नरवाल (64 किलो), बिश्वमिता चाँगथोम (49 किलो), विशाल गुप्ता (91 किलो) यांना मात्र उपांत्य फेरीत पराभूत झाल्याने तिसऱया स्थानावर समाधान मानावे लागले. अंकिता व बिश्वमिता यांना अनुक्रमे कझाकच्या साबिरझान अकालिकोव्ह व संझार ताश्केनबरे यांच्याकडून 1-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला.