बेळगाव / प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार निवडीची प्रक्रिया सुरू आहे. मध्यवर्ती म. ए. समितीने उमेदवार निवड प्रक्रियेत लूडबूड करू नये. मागील विधानसभा निवडणुकीवेळी कोल्हापूरहून उमेदवार लादले गेले व पराभव पत्करावा लागला. तथाकथित मध्यवर्तीच्या मागे जनता नाही. त्यामुळे आमच्या दृष्टीने मध्यवर्ती म. ए. समिती बरखास्त झाल्यासारखीच आहे.
उमेदवारी निवडीत मध्यवर्ती म. ए. समितीने हस्तक्षेप करू नये. तसेच तालुका म. ए. समितीचा या निवडणुकीशी काहीही संबंध नाही. उमेदवारांची निवड करण्यास शहर म. ए. समिती आणि त्या-त्या वॉर्डाचे नागरिक सक्षम व समर्थ आहेत. एकच एक उमेदवार देण्याच्यादृष्टीने वॉर्डमध्ये नागरिकांचे प्रयत्न सुरू आहेत. एकी होण्यासाठी शहर म. ए. समिती सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. एकीच्या या प्रक्रियेमध्ये कोणी बेकी करू नये. एकीची प्रक्रिया झाल्यानंतर योग्यवेळी शहर म. ए. समिती आपले उमेदवार जाहीर करील. प्रत्येक वॉर्डमध्ये एकच एक उमेदवार देण्यासाठी वॉर्डातील नागरिकांनी उमेदवारावर दबाव आणावा, असे कळकळीचे आवाहन शहर म. ए. समितीचे सरचिटणीस किरण गावडे यांनी केले आहे.